नवी मुंबई : पनवेल मधील फळ विक्रेत्याची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी एजंटसह कर्नाटकमधील दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फळ व्यवसायीक साहिब अधिकारी यांची हिंदीया ट्रेडींग नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून ते एपीएमसीच्या फळ मार्केटमधून विविध प्रकारची फळे विकत घेऊन ती इतर ठिकाणी विकत. त्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये उरण येथील शिव एंटरप्रायझेस कंपनीकडून सफरचंदचे दोन कंटेनवर खरेदी केले होते. हा माल वाशी येथील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवला होता. एपीएमसी फळ मार्केट परिसरातील दलाल सलीम याने त्याला सफरचंद च्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्याचे अमिष दाखविले.
कर्नाटकमधील साजीद व सय्यद नावाच्या विक्रेत्याला दोन ट्रक सफरचंदची विक्री केली. यासाठी १७ लाख रुपये बिल देणे आवश्यक होते. परंतु संबंधीतांनी दोन लाख रुपये दिले व उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली होती. एजंटनेही ३७ हजार रुपये दलाली घेतली होती. पण पैसे मिळवून दिले नाहीत. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये साजीद, सय्यद व सलीम या तिघांविरोधात १५ लाख ८ हजार रुपये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.