गुजरातच्या भामट्यांनी घातला ठेकेदाराला गंडा; ४५ लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 08:55 PM2023-09-18T20:55:51+5:302023-09-18T20:56:05+5:30
जिओचे कामही गेले, पदरी पडले नादुरुस्त मशीन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : जिओच्या फायबर टाकण्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराची गुजरातच्या भामट्यांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामासाठी लागणारे मशीन देण्याच्या बहाण्याने ४५ लाख रुपये घेऊन नादुरुस्त मशीन त्यांना पोच केले होते. यामध्ये कराराचा अवधी निघून गेल्याने ठेकेदाराच्या हातचे कामही गेले असून इतरही लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे.
सानपाडा येथे राहणाऱ्या विजयकुमार सिंग यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना रिलायन्स जिओच्या फायबर टाकण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामासाठी लागणाऱ्या मशीनच्या ते शोधात होता. यावेळी त्यांना गुजरातच्या कंपनीची माहिती मिळाली असता त्याठिकाणी ते गेले होते. या निमित्ताने त्यांची भेट हेमाक्सीबा दोडिया, अनिरुद्धसिंग दोडिया, ज्वेल ओझा, अक्षय पाचलट व सुनील पाठक यांच्याशी झाली होती. यावेळी दोडिया पिता पुत्रांनी सिंग यांना विश्वासात घेऊन त्यांना ४५ लाखात चांगल्या दर्जाचे मशीन तातडीने उपलब्ध करून देतो असे सांगितले होते. त्यानुसार सिंग यांनी त्यांना ठरलेली रक्कम अदा केली होती. मात्र त्यानंतर त्यांना वेळेत मशीन उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. यामुळे त्यांचे दिवसाला लाखोंचे नुकसान होत असल्याने त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांनी एक मशीन पाठवले असता ते देखील नादुरुस्त असून त्याचे निम्म्याहून अधिक भाग त्यामध्ये नव्हते.
यामुळे पुन्हा सिंग यांनी दोडिया पिता पुत्राला संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत दोन केंद्रीय मंत्र्यांच्या नावे धमकी दिली. तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारण्याची देखील धमकी दिली. यामुळे वेळेत काम न सुरु करू शकल्याने सिंग यांच्यासोबतचा जिओने कामाचा कोट्यवधी रुपयांचा करार देखील रद्द केला. तर पदरी पडलेले मशीन दुरुस्तीच्या प्रयत्नात त्यांना लाखो रुपयाचा फटका देखील बसला. याप्रकरणी त्यांनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली असता रविवारी हेमाक्सीबा दोडिया, अनिरुद्धसिंग दोडिया, ज्वेल ओझा, अक्षय पाचलट व सुनील पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.