भूखंड खरेदीत नौदल अधिकाऱ्यांची फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 10, 2023 04:21 PM2023-10-10T16:21:49+5:302023-10-10T16:27:05+5:30
३ कोटी १३ लाखाचा अपहार
नवी मुंबई : उरण परिसरात भूखंड घेण्यासाठी इच्छुक असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. स्काय गरुडा नावाच्या कंपनीकडे त्यांनी भूखंडासाठी पैसे भरले होते. परंतु पैसे भरल्यानंतर भूखंडाचा ताबा देण्यास टाळाटाळ होऊ लागल्यानंतर फसवणूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर चार वर्षांनी याप्रकरणी संबंधित तिघांविरोधात केलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौदलात सुभेदार पदावर असलेल्या संजीत पॉल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नौदलाच्या १७ अधिकाऱ्यांनी स्काय गरुडा कंपनीची उरण परिसरातल्या भूखंड विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्याद्वारे त्यांनी २०१९ मध्ये कंपनीच्या सीबीडी येथील कार्यालयात येऊन नॉन ऍग्रीकल्चर केलेला भूखंड घेण्यास इच्छुकता दर्शवली होती. त्यासाठी सर्वानी मिळून टप्प्या टप्प्याने एकूण ३ कोटी १३ लाख रुपये स्काय गरुडाचे काकासाहेब खाडे, विकास दहिफले, मोहिनी तांदळे यांना दिले होते.
पैसे घेतल्यानंतर काही दिवसात त्यांनी नोंदणीला टाळाटाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर दाखवलेल्या भूखंडाऐवजी दुसरा भूखंड देतो असे सांगण्यात आले. यामुळे काही अधिकाऱ्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता त्यांना धनादेश देण्यात आले होते. परंतु ते धनादेश न वटल्याने व तिघांनीही संपर्क तोडल्याने फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी कार्यालयात धाव घेतली असता ते देखील बंद झाल्याचे समोर आले. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. त्याद्वारे काकासाहेब खाडे, विकास दहीफले व मोहिनी तांदळे यांच्यावर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी इतरही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.