नवी मुंबई : फेसबुकवर महिलेच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून वृद्धाला ९ लाख ४३ हजारांचा गंडा घातला आहे. फुकटात अमेरिकन डॉलर पाठवते सांगितल्यानंतर ते पार्सल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कारणांनी त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरुळ येथे राहणाऱ्या सुखदेव शिंदे (६३) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना जेनी बार्टली नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी ती स्वीकारली असता आपण यूएस आर्मी मध्ये असल्याचे त्या खातेधारकाने सुखदेव यांना सांगितले. तसेच त्यांना काही अमेरिकन डॉलर पाठवत असल्याचेही त्यांना सांगण्यात आले. यानंतर काही दिवसातच सुखदेव यांना एका व्यक्तीने दिल्ली कस्टममधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे अमेरिकेतून पार्सल आले असून ते घेण्यासाठी कस्टम ३८ हजार रुपये चार्ज मागितला.
सुखदेव यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या खात्यावर रक्कम पाठवताच काही दिवसांनी त्यांना आयकर विभागाकडून बोलत असल्याचे सांगून तसेच इतर विविध कारणांनी त्यांच्याकडून तब्बल ९ लाख ४३ हजार रुपये घेण्यात आले. यानंतर देखील आपल्याला पार्सल मिळत नसल्याने त्यांनी संबंधितांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद द्यायचे बंद केले. यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनिवारी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली.
अधिक तपास सुरू
जेनी बार्टली नावाच्या फेसबुक खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतरही सुखदेव हे फेसबुकवरील अज्ञात व्यक्तीच्या बतावणीला फसल्याने त्यांना ९ लाख ४३ हजार रुपये गमवावे लागले आहेत.