दामदुप्पट देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By admin | Published: January 26, 2017 03:29 AM2017-01-26T03:29:47+5:302017-01-26T03:29:47+5:30
जादा नफ्याचे आमिष दाखवून ७२ लाखांचा अपहार झाल्याची घटना न्हावाशेवा येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
नवी मुंबई : जादा नफ्याचे आमिष दाखवून ७२ लाखांचा अपहार झाल्याची घटना न्हावाशेवा येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पनवेल येथे कार्यालय थाटून त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे.
कंपनीत गुंतवणूक करुन जादा नफा कमवण्याचे आमिष दाखवून न्हावा ग्रामस्थांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पुष्पाताई घरत (५०) यांनी न्हावा शेवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकारात अनेकांची आर्थिक फसवणूक झालेली असून त्यापैकी १८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यानुसार महेश पाटील, महेश नाईक व सुरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी सांगितले. या तिघांनी पनवेल येथे बनावट कंपनीचे कार्यालय थाटले होते. सदर कंपनीत आर्थिक गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल असे आमिष त्यांच्याकडून दाखवले जात होते. यानुसार अनेकांनी १ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सदर कंपनीत केली होती. मात्र वर्षाचा कालावधी पूर्ण होवूनही त्यापैकी कोणालाही कंपनीकडून नफ्याची रक्कम अथवा गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेचा परतावा मिळाला नाही. यामुळे त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर संधी साधून त्या तिघांनी बनावट कंपनीचे कार्यालय बंद करुन पळ काढला. (प्रतिनिधी)