शिपिंगमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 10:26 AM2023-05-23T10:26:02+5:302023-05-23T10:26:09+5:30
गुन्हा दाखल : कार्यालय गुंडाळून ठोकली धूम
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शिपिंगमध्ये नोकरीस इच्छुक असणाऱ्यांना विदेशात नोकरीची हमी देऊन वेगवेगळ्या कारणांनी पैसे उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एपीएमसी आवारात कार्यालय थाटून त्यांनी तरुणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र, पैसे हाती लागल्यानंतर त्यांनी कार्यालय बंद करून पळ काढल्याचे उघडकीस आले.
एपीएमसी आवारात फ्युचरिक मेरिटाईम नावाने कार्यालय थाटून संबंधितांनी अनेकांना गंडा घातला आहे. मरीन अकॅडमीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना फोन करून नोकरीची हमी देण्यात आली होती, तर नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना एपीएमसीमधील कार्यालयात बोलावून त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यामध्ये काहींना सिंगापूर व इतर देशात शिपिंग कंपन्यांमध्ये नोकरीची खात्री देऊन प्रत्येकाकडून ३ ते ५ लाख रुपये उकळण्यात आले होते.
यानंतर त्यांना काही दिवसातच वेगवेगळ्या देशातील कंपन्यांमध्ये नोकरीचे नियुक्तिपत्र, व्हिजा व तिकीट दिले जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, दोन महिने उलटूनही प्रत्यक्षात तिकीट मिळत नसल्याने काहींनी एपीएमसीमधील कार्यालयात धाव घेतली.
अपहाराची रक्कम कोटींच्या घरात?
यावेळी काही दिवस अगोदरच कार्यालय बंद करून संबंधितांनी पळ काढल्याचे समोर आले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली असता अजहर मुल्ला, अंकिता, आशिका, शिवम, निधी यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांची पूर्ण नावे अथवा त्यांच्याबद्दलची अधिक माहिती तरुणांना नाही. त्यांनी देशभरातील अनेक तरुणांना नोकरीच्या बहाण्याने गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपहाराची रक्कम कोटींच्या घरात जाण्याची शक्यता नाकारत येत नाही.