कर्जाच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

By admin | Published: April 10, 2017 06:19 AM2017-04-10T06:19:50+5:302017-04-10T06:19:50+5:30

व्यवसायासाठी केलेल्या आर्थिक मदतीतून महिलेला कर्जबाजारी करून चक्रवाढ व्याजासाठी धमकावल्याचा

Fraud of the woman with the help of loan | कर्जाच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

कर्जाच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

Next

नवी मुंबई : व्यवसायासाठी केलेल्या आर्थिक मदतीतून महिलेला कर्जबाजारी करून चक्रवाढ व्याजासाठी धमकावल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
ओळखीचा फायदा घेत या महिलेवर कर्जाचा डोंगर करून काही महिलांचाच बेकायदा सावकारी व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार त्यावरून समोर आला आहे.
वर्षा पाटील (३७) असे घनसोलीतील पीडित महिलेचे नाव आहे. पतीच्या व्यसनाला कंटाळून त्या माहेरी राहत असून उदरनिर्वाहासाठी साड्या विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातला तोटा भरून काढण्यासाठी त्यांना सुरुवातीला ३० हजार रुपयांची गरज होती. या वेळी त्यांनी परिचयाच्या सुरेखा मढवी यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती; परंतु काही दिवसांनी त्यांनी दिलेल्या रकमेच्या बदल्यात २५ टक्के व्याजाची मागणी केल्यामुळे वर्षा पाटील यांच्यापुढील आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या होत्या.
दरम्यान, शीतल शेट्टीयार या महिलेने त्यांची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन वर्षा यांनी अगोदरचे कर्ज फेडले होते. अशातच शेट्टीयार यांनीही त्यांच्याकडे दिलेल्या मूळ रकमेसह व्याजाच्या रकमेची मागणी केली. या संपूर्ण प्रकारात कर्जाच्या मूळ रकमेऐवजी चक्रवाढ व्याजाच्या रूपानेच ४५ लाख रुपये कर्ज असल्याचे भासवून आपली फसवणूक होत असल्याचे वर्षा पाटील यांच्या लक्षात आले; परंतु अधिक चौकशी करण्याला सुरुवात केली असता, वर्षा यांना सदर महिलांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. या प्रकारात शेट्टीयार यांनी आपल्याला घरी बोलावून मारहाण केल्याचा, तसेच मुलाने विरोध केल्याने त्यालाही ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वर्षा यांनी केला आहे.
शेट्टीयार व तिच्या सहकारी महिला इतर सामान्य महिलांसोबत ओळख वाढवून त्यांना आर्थिक मदत करत आहेत. मात्र, त्यानंतर भरमसाठ व्याजाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असून, त्यांच्यावर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, वर्षा यांच्या विरोधातही संबंधित महिलांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केलेली असल्याने पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fraud of the woman with the help of loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.