कर्जाच्या बहाण्याने महिलांची फसवणूक
By admin | Published: April 1, 2017 06:23 AM2017-04-01T06:23:58+5:302017-04-01T06:23:58+5:30
शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे
नवी मुंबई : शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ५००हून अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘व्ही केअर इंडिया’ या कंपनीच्या नावाने दोघांनी महिलांना कर्जाचे आमिष दाखवले होते. त्यानुसार जुहूगावातील शेकडो महिलांनी व्यवसाय व उद्योगासाठी कर्जाची मागणी केली होती.
कंपनीच्या वतीने राकेश त्रिवेदी व महेश जाधव या दोघांनी प्रोसेसिंग फी च्या नावाखाली या महिलांकडून ४० हजार ते १ लाख रुपयेपर्यंतची रक्कम घेतली होती. दोघेही रबाळे व नेरुळचे राहणारे आहेत. कर्ज घेणाऱ्याची पात्रता तपासण्यासाठी ही प्रक्रिया असून, कर्ज मंजूर झाल्यानंतर ही रक्कमदेखील परत दिली जाणार असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून महिलांनी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते.
सुरुवातीला काही महिलांना थोड्याफार रकमेचे कर्जही दिले. त्यांना कर्ज मिळाल्याने आपल्यालाही कर्ज मिळेल, या अपेक्षेने इतरही महिलांनी उत्सुकता दाखवली होती. मात्र, पैसे भरून चार ते पाच महिने होऊनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी जाधव व त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. यानुसार त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)