दहा दिवसांत १२ जणांवर केले मोफत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:12 AM2020-08-08T01:12:45+5:302020-08-08T01:12:55+5:30
कर्तव्य भावनेतून उपक्रम : तरुणाईची सेवा
नवी मुंबई : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर युवक काँग्रेसच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले आहेत. दहा दिवसांत १२ जणांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढतोच आहे. त्यामुळे प्रतिदिन ५ ते ८ जणांचा मृत्यू होत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांमधील अनेक जण कोरोनामुळे उपचार घेत असल्याने, त्यांना अंत्यविधीला जाता येत नाही. अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही, अशा मृतदेहांवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे. त्याकामी तरूण मुलं त्यांना मदत करत आहेत.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अनिकेत म्हात्रे यांनी या उपक्रमाविषयी सांगितले की, २९ जुलैपासून हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत बारा मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सर्व पदाधिकारी पीपीई किटचा वापर करून व योग्य खबरदारी घेऊन ही जबाबदारी पार पाडत आहेत. मृत्यूनंतर मृतदेहावर विधीवत योग्य अंत्यसंस्कार होणे आवश्यक आहे, परंतु कोरोनामुळे नातेवाईक व परिवारातील सदस्यांना उपस्थित राहता येत नाही. अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठीचा खर्चही पक्षाच्या वतीने केला जात आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध
च्राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी नवी मुंबईसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मोफत सेवा दिली जात असून, शहरात प्लाझ्मा दान करण्यासाठी नोंदणी सुरू केली असल्याची माहिती अनिकेत म्हात्रे यांनी दिली.