दररोज ७०० किलो ऑक्सिजनचे मोफत वाटप; गुरुद्वारा गुरुनानक दरबारकडून सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:43 PM2021-04-29T23:43:46+5:302021-04-29T23:43:56+5:30
गुरुद्वारा गुरुनानक दरबारकडून सेवा
कळंबोली : कोरोनाबाधितांना वैद्यकीय उपचारात मोफत प्राणवायुद्वारे नवसंजीवनी देण्याचे काम नवीन पनवेल येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारकडून केले जात आहे. दररोज ७०० किलोपेक्षा जास्त ऑक्सिजनचे वाटप करण्यात येत असून २०० पेक्षा जास्त जणांना प्राणवायुमुळे नवे आयुष्य मिळाले आहे.
पनवेल पालिका क्षेत्रातील परिस्थिती वाढत्या कोरोनामुळे चिंताजनक बनली आहे. मला श्वास घेता येत नाही….हे शब्द सध्या घरातून तसेच रुग्णालयातून ऐकायला मिळत आहेत. रुग्णांसाठी औषधाप्रमाणे ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. ऑक्सिजन पातळी कमी झाली की, नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकतो. प्राणवायू मिळण्यासाठी पळापळ करावी लागते. या काळात अनेकांची ऑक्सिजन पातळी स्थिर ठेवण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. या कसोटी काळात नवीन पनवेल येथील गुरुद्वारा गुरुनानक दरबारकडून मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या गुरुद्वारामध्ये ७ किलो, १० किलो, १६ किलो जम्बो सिलिंडर मिळत आहेत. ही सेवा आठवडाभरापासून मोफत सुरू आहे. ऑक्सिजन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल महापालिका परिसरातील नागरिक येत आहेत.
दररोज ७०० किलोंपेक्षा जास्त प्राणवायू सिलिंडरचे वाटप केले जात आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी रुग्णाचा कोविड रिपोर्ट, आधारकार्ड देऊन ऑक्सिजन सिलिंडर दिले जात आहे. यामुळे घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी गुरुद्वारामधील हरविंद्र सिंग सोनू , बलदेव सिंग , बलविंदर सिंग सैनी , जगजीत सिंग गुटर , अमरजीत सिंगसह ३० जण गरजूवंतांसाठी झटत आहेत.
भुकेल्या पोटासाठी आधार….
गुरुद्वारामार्फत भुकेल्यांसाठी दररोज ५०० जणांचे जेवण मोफत देण्यात येत आहे. तर आतापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८०० जणांना कोरडा शिधा वाटप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या घरी सॅनिटायझर करण्याचे कामदेखील गुरुद्वारामार्फत मोफत केले जात आहे. कोरोना काळात अनेकांना गुरुद्वारा गुरुनानक दरबार आधार बनला आहे.