रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजन; वाशीतील अग्रवाल दाम्पत्याचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:47 PM2020-01-12T23:47:36+5:302020-01-12T23:47:50+5:30
रिजेन्सी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अग्रवाल दाम्पत्याने सुरू केलेल्या मोफत भोजन वाटप योजनेवर गेल्या वर्षभरात तब्बल ४३ लाख २० हजार रुपये खर्च झाले आहेत.
नवी मुंबई : घरातील एखादी व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल असते, तेव्हा सर्वाधिक कसोटी त्याच्या नातेवाइकांची होते. उपचार घेणारी व्यक्ती गरीब आणि कष्टकरीवर्गातील असेल तर त्याच्या नातेवाइकांचे होणारे हाल अत्यंत वेदनादायी असतात. झोपेचे खोबरे, जेवणाची आभाळ झालेले रुग्णांचे शेकडो नातेवाईक हॉस्पिटलच्या आवारात पाहावयास मिळतात. भुकेने व्याकूळ झालेल्या अशा नातेवाइकांना स्वखर्चातून एका वेळचे भरपेट जेवण देण्याचा सेवाभावी उपक्रम वाशीतील अग्रवाल दाम्पत्याने सुरू केला आहे. या उपक्रमाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. विशेष म्हणजे, या दाम्पत्याने गेल्या वर्षभरात या मोफत खानावळीवर तब्बल ४३ लाख २० हजार रुपये खर्च केले आहेत.
महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण विविध आजाराच्या उपचारासाठी येतात. येथे येणाऱ्यांत विशेषत: गरीब व कष्टकरी रुग्णांचा सर्वाधिक सहभाग असतो. आजाराच्या स्वरूपानुसार अनेकदा रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले जाते. अशा वेळी त्याच्याबरोबर असणाºया नातेवाइकांचे मात्र कमालीचे हाल होतात.
विशेषत: त्यांच्या जेवणाची मोठ्या प्रमाणात आबाळ होते. ही बाब लक्षात घेऊन ललित अग्रवाल आणि सुमन अग्रवाल या दाम्पत्याने रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसातून एकदा घरगुती पद्धतीचे रुचकर जेवण देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार त्याची जुळवाजुळव करण्यात आली. वाशी सेक्टर १० ए येथील महापालिका रुग्णालयाच्या शेजारी विनावापर पडून असलेल्या जागेवर हा उपक्रम राबविण्याचे निश्चत झाले. अखेर १२ जानेवारी २०१९ पासून या सेवाभावी उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. मागील वर्षभरापासून २५० ते ३०० गरजूंना येथे दरदिवशी दुपारचे मोफत भोजन दिले जाते. विशेष म्हणजे, अग्रवाल दाम्पत्य स्वत: उभे राहून गरजूंना जेवण वाढतात. एकाही दिवसाचा खंड न पडू देता हे दाम्पत्य स्वखर्चातून हा उपक्रम यशस्वरीत्या राबवित आहे. या सेवाभावी उपक्रमाला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने भोजन वाटपस्थळावर एका छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार गणेश नाईक हे या कार्यक्रमाला अवर्जून उपस्थित होते. त्यांनी ललित अग्रवाल आणि सुमन अग्रवाल या दाम्पत्याचे भरभरून कौतुक केले. समाजात अशाप्रकारच्या उपक्रमाची गरज असल्याचे ते म्हणाले. तर फिटनेसतज्ज्ञ व क्रिकेटपटू अभय धोंडीराम वाघमारे यांनी आपल्या छोटेखाणी भाषणातून या उपक्रमाचा सुरुवातीपासूनचा आढावा घेतला. हेतू नि:स्वार्थ असेल तर काही अवघड नसते, हे अग्रवाल दाम्पत्याने आपल्या कृतीतून सिद्ध केल्याचे वाघमारे यांनी सांगितले. ललित अग्रवाल यांनी आपल्या प्रस्ताविकातून उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला. तसेच या सेवाभावी उपक्रमासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत मांडले. या वेळी सेंट मेरीज मल्टीपर्पज हायस्कूलचे फादर अब्राहिम जोसेफ, माजी खासदार संजीव नाईक व नेरुळ लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
वर्षभरात ४३ लाख रुपये खर्च
रिजेन्सी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अग्रवाल दाम्पत्याने सुरू केलेल्या मोफत भोजन वाटप योजनेवर गेल्या वर्षभरात तब्बल ४३ लाख २० हजार रुपये खर्च झाले आहेत. हा सर्व खर्च अग्रवाल दाम्पत्याने स्वत:च्या खिशातून केला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात उपक्रमाची उपयोगिता सिद्ध झाली आहे, त्यामुळे समाजातील अधिकाधिक लोकांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली आहे.