मोफत वाय-फाय ठरले औटघटकेचे
By admin | Published: July 13, 2015 02:57 AM2015-07-13T02:57:52+5:302015-07-13T02:57:52+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या
कमलाकर कांबळे , नवी मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी सुरू केलेली मोफत वाय - फाय सेवा औटघटकेची ठरली आहे. गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या या वाय-फाय सेवेने निवडणूक संपताच मान टाकली आहे. त्यामुळे सायबर सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या या शहरातील तरुणाईला जलद इंटरनेट सेवेसाठी मॉल्स किंवा बड्या रेस्टॉरेंटचा आधार घ्यावा लागत आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होत आहे. शहरात आयटी उद्योगाचे जाळे विणले गेले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवा पुरविणारी कॉल सेंटर्सही आहेत. त्यामुळे इंटरनेट वापराचे प्रमाणही लक्षणीय आहे. इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने सायबर सिटीत महत्त्वाच्या ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने चार वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे खीळ बसली होती. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी सवंग प्रसिध्दीसाठी शहरवासीयांना मोफत वाय-फाय सेवा देण्याच्या वल्गना केल्या होत्या. काही ठिकाणी त्याचा शुभारंभही झाला. मात्र ही सेवा लवकरच बंद पडली.
ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शहरात सर्वप्रथम मोफत वाय-फाय सेवेचा शुभारंभ केला. पहिल्या टप्प्यात वाशी आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकात ही सेवा उपलब्ध करण्यात आली होती. त्यानंतर सर्व स्थानकांत ही सेवा सुरू करण्याची घोषणा राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात केली होती. प्रत्यक्ष मात्र सुरू करण्यात आलेली दोन स्थानकांतील वाय-फाय सेवा पंधरा दिवसांतच बंद झली होती. विधानसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच पालिकेच्या निवडणुका लागल्या. पुन्हा मोफत वाय-फाय सेवेची हवा सुरू झाली. सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी नेरूळ गावात शुभारंभ केला. त्यापाठोपाठ कोपरखैरणे सेक्टर १२ परिसरात शिवसेनेचे विलास म्हात्रे यांनी ही सेवा सुरू करून मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक इच्छुकांकडून आपापल्या प्रभागातील नागरिकांना मोफत वाय-फाय सेवेचा ट्रेलर दाखविण्यात आला. मात्र निवडणुकीचा फड संपताच वाय-फाय सुविधेचा खेळही संपुष्टात आला.