पंधरा हजार घरांना स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त, सिडकोचा सर्वात मोठा गृहप्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 03:42 AM2018-08-03T03:42:27+5:302018-08-03T03:42:43+5:30
सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या १५ हजार घरांच्या विक्रीसाठी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. ही घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत. १५ आॅगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक घटकांसाठी पुढील वर्षभरात नवी मुंबई क्षेत्रात ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी १४,८२० घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ही घरे कळंबोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली या पाच नोडमध्ये उभारली जात आहेत. यात एकूण ११ गृहप्रकल्पाचा समावेश असणार आहे. सिडकोने याअगोदर विविध गृहप्रकल्प उभारले आहेत; परंतु एकाच वेळी १४,८२० घरांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातील अत्यल्प गटातील घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत. स्वातंत्र्यदिनापासून या घरांच्या प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याची माहिती सूत्राने दिली.
सिडकोने आतापर्यंत विविध घटकांसाठी सव्वा लाख घरांची निर्मिती केली आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात सिडकोला गृहनिर्मितीचा विसर पडला होता. त्यामुळे बजेटमधील घरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, आजही सिडकोच्या घरांना सर्वसामान्य घटकांची पसंती आहे, त्यामुळेच आगामी काळात विविध घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. १५ हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करतानाच पुढील वर्षभरात ४० हजार घरांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या घरांच्या बांधकामालाही लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अर्जपुस्तिका विक्रीला फाटा
आतापर्यंतच्या विविध गृहप्रकल्पात घरांच्या नोंदणीसाठी सिडकोने अर्जविक्रीची प्रक्रिया राबविली होती. अर्जपुस्तिका विक्री करताना येणाऱ्या अडचणी, त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहकांची होणार दमछाक तसेच या प्रक्रियेसाठी लागणारे अतिरिक्त मनुष्यबळ आदीचा विचार करून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अर्जपुस्तिका विक्रीला फाटा देत, म्हाडाच्या धर्तीवर आॅनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार १४,८२० घरांसाठी आॅनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.
दोन वर्षांत ग्राहकांना ताबा
शहराच्या पाच नोडमध्ये ११ कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून १४,८२० घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यामुळे पात्र ठरलेल्या ग्राहकांना सहा हप्त्यात घरांचे पैसे भरता येणार आहेत.