रस्त्यांवर वारंवार खोदकाम
By admin | Published: March 27, 2017 06:33 AM2017-03-27T06:33:42+5:302017-03-27T06:33:42+5:30
खारघर शहरात तीन महिन्यांपासून विविध कारणांनी शहरातील रस्ते खोदले जात आहेत. वारंवार शहरातील विविध
पनवेल : खारघर शहरात तीन महिन्यांपासून विविध कारणांनी शहरातील रस्ते खोदले जात आहेत. वारंवार शहरातील विविध सेक्टरमध्ये खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. या खोदकामाचा परिणाम वाहतुकीवरही होत असून, वाहतूक पोलीस देखील या कारभाराला कंटाळले आहेत. खारघर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित कंपनीला पत्रही दिले आहे.
खारघर शहरात १ ते २५ सेक्टरमध्ये महावितरणच्या वतीने सबस्टेशनासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच रिलायन्स फोरजीच्या विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी शहरात अशाच प्रकारे रस्ते उखडण्यात आले होते. शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर असताना, रस्ते खोदल्याने चालकांना वाहने पार्क करताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक वेळा शहरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. संध्याकाळी, घाईत कामावरून परतणाऱ्यांना खोदलेल्या खड्डे दिसत नसल्याने पादचारी खड्ड्यात पडतात आणि दुखापत होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
शुक्रवारी सेक्टर १८ येथील नीळकंठ स्वीट या मिठाईच्या दुकानापाशी खोदलेल्या खड्ड्यात एक महिला पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. खारघर शहर शिवसेनेचे युवा नेते मनीष पाटील यांनी यासंदर्भात सिडकोला लेखी पत्र दिले आहे. मात्र अद्याप पत्राची दखल घेतली गेलेली नाही. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे. (वार्ताहर)