५० वर्षांनी भेटलेल्या मित्र- मैत्रिणींचे डोळे पाणावले; स्नेहसंमेलनातुन माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 05:31 PM2022-12-19T17:31:50+5:302022-12-19T17:35:52+5:30
विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मधुकर ठाकूर, उरण : मित्र म्हटले कि गप्पा आणि शाळेतील बालपणीचे मित्र म्हटले कि आठवणींना उजाळा. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील एन.आय. हायस्कुलच्या १९७२ च्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (१८)एकत्र येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. तर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शाळेतील आठवणी नेहमीच हव्याहाव्याशा वाटतात. मात्र शिक्षणाचे पुरेसे धडे घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त होतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी आयुष्यात येत असतात. मात्र शाळेतील मित्र आणि त्याच्या सोबतचे क्षण हे विसरता येत नाहीत. नेहमीच आपण आपल्या शाळेतील आठवणी एकमेकांशी शेअर करत असतो. अशाच शालेय मित्रांनी एकत्र येऊन, स्नेहसंमेलन साजरे करून आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची कल्पना किती सुंदर असते हे उरणमधील एन. आय. हायस्कुलमध्ये पहायला मिळाले आहे.
१९७० सालच्या १० वी च्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले. त्यावेळचे तरुण विद्यार्थी आज जरी वृद्ध अवस्थेत असले तरी त्यांच्या आठवणी आजही ताज्या असल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. यावेळी ५० वर्षांपूर्वी त्यांना शिकवणारे अनेक शिक्षकही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. ५० वर्षानंतर पुन्हा आपल्या शाळेच्या बाकावर बसून कसे वाटते असे यातील एका विद्यार्थिनीला विचारले असता, त्यावेळी लहान होती. आता मोठी झाली आहे. त्यामुळे बाक बसण्यासाठी लहान झाला आहे. एव्हढ्या वर्षानी पुन्हा एकत्र येऊ असे वाटले नव्हते. मात्र आज सर्वजण पुन्हा एकत्र पाहून डोळ्यांत आनंदाश्रू येत असल्याची प्रतिक्रिया दिली. काहीनी चाळीच्या स्वरूपात असणारी जुनी शाळा हवी हवीशी असल्याचे मत व्यक्त केलं. तर याच बॅचचे विद्यार्थी सदानंद गायकवाड हे आज या शाळेचे चेअरमन आहेत.
त्यांनी कशाप्रकारे सर्वांना एकत्र आणले, यासाठी कोणी कशी मेहनत घेतली याबाबत माहिती दिली. तालुक्यातील महत्वाची आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे काम करणाऱ्या एका नामांकित इंग्रजी शाळेचे संचालक मिलिंद पाडगावकर हे देखील एका बाकावर बसले होते. त्यांनीही बोलताना एन. आय. हायस्कुलच्या वर्गांमध्ये मराठी माध्यमाचे धडे घेऊन, आज भक्कमपणे उभा राहिलो असल्यानेच एक इंग्रजी शाळेचा संचालक म्हणून भूमिका बजावत असल्याचे सांगत मला माझ्या शाळेचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. तर आज वकिली क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारे प्रसिध्द विधीज प्रमोद ठाकूर यांनी आपल्या दोन पिढ्या या शाळेत शिकल्या आहेत.या शाळेने आम्हाला समाजामध्ये ठामपणे उभे राहण्याची प्रेरणादायी दिली असल्याची भावना व्यक्त केली. तब्बल ५० वर्षानी एकत्र येत पुन्हा आपल्या शाळेमध्ये वर्गातील बकावर बसून, या विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव आणि जुन्या आठवणी व्यक्त करताना डोळ्यांच्या पापाण्या पाणावलेल्या पहायला मिळाल्या.
५० वर्षांनंतर वृद्धावस्थेतही आपल्या बालपणातील शाळेतील दिवस पुन्हा अनुभवायला मिळणे ही सर्वात मोठी आणि आनंदाची बाब आहे. असं म्हणतात कि बालपण गेलं कि पुन्हा मिळत नाही. मात्र आजच्या डिजिटल युगामुळे हे शक्य झाले आहे. सोशल मीडियाचा आधार घेत ५० वर्षानी पुन्हा एकदा बालपण जगण्याची संधी आता प्रत्येकाला मिळत आहे. १९७२ नंतर पुन्हा एकदा एकमेकांना भेटून आठवणींना उजळा देताना हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वारंवार साजरा करून एकमेकांनी बालपणीचे दिवस पुन्हा जगण्याचे या कार्यक्रमातून ठरविण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"