खारघरहून थेट जा जेएनपीएसह नवी मुंबई विमानतळावर
By नारायण जाधव | Published: December 14, 2023 03:53 PM2023-12-14T15:53:41+5:302023-12-14T15:54:13+5:30
सिडकोने आपल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सायन-पनवेल रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रवाशांना पर्यायी प्रवासाठी खारघर ते उलवे असा सागरी किनारा प्रस्तावित केला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वांत प्रतिष्ठित अशा खारघर नोडमधून उलवे, जेएनपीए बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी आता बेलापूर नोडला वळसा घालून जाण्याची गरज भासणार नाही. कारण सिडकोने खारघर ते उलवेपर्यंत सागरी रस्ता प्रस्तावित केला आहे.
सिडकोने आपल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सायन-पनवेल रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रवाशांना पर्यायी प्रवासाठी खारघर ते उलवे असा सागरी किनारा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २०५ कोटी ४९ लाख रुपयांची तरतूूद केली आहे.
तळोजा येणार विमानतळाच्या अधिक जवळ
खारघर नोडसह येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क, तळोजा आणि खारघर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पात राहायला येणाऱ्या रहिवासी आणि व्यावसायिकांना थेट उलवेसह सी लिंक, जेएनपीए आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे या रस्त्याद्वारे जाता येणार आहे. यामुळे सध्याचा बेलापूर किल्लेगावठाण मार्गे होणारा वळसा टळून वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे.
दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटीही वाढणार
प्रस्तावित सागरी रस्ता १०.१० किमी लांबीचा असून सहा पदरी राहणार आहे. यामुळे नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईची कनेक्टिव्हिटीही सीलिंकमुळे वाढण्यास मदत होणार आहे. सिडकोने याआधीच यासाठी महत्त्वपूर्ण सीआरझेड मंजुरी मिळवली आहे.
खारकोपर ते उलवे होणार अंडरपास
आता सिडकोने खारकोपर येथील पंतप्रधान आवास योजनेचा गृहप्रकल्प ते उलवे सेक्टर-१३ यांना जोडणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू केली आहे. यात खारकोपर स्टेशनच्या दोन्ही बाजूचा ३० मीटर रुंदीच्या उर्वरित रस्ता आणि उलवे सेक्टर १३ पर्यंत अंडरपासचीही प्रक्रिया सुरू केली आहे. या कामावर पावणेतेरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.