गॅस पाइपलाइनविरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 07:05 AM2018-03-07T07:05:29+5:302018-03-07T07:05:29+5:30
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही एचपीसीएल कंपनी आणि संबंधित ठेकेदार जाणूनबुजून लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
अलिबाग - सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार दुर्लक्ष करते तेव्हा अन्यायाविरोधात संघटित होऊन प्रतिकार केला जातो. अशीच परिस्थिती सध्या पेण तालुक्यातील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा येथील नागरिकांवर ओढवली आहे. नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही एचपीसीएल कंपनी आणि संबंधित ठेकेदार जाणूनबुजून लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम करत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यातून मार्ग न काढल्यास पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा गॅस पाइपलाइन हटाव कृती समितीने दिला आहे.
कृती समितीचे निमंत्रक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मोर्चाला पोलिसांनी हिराकोट तलाव परिसरात अटकाव केला. त्यानंतरच मोर्चाचे तेथेच सभेमध्ये रूपांतर
झाले.
एचपीसीएल कंपनीने उरण (भेंडखळ) ते शिक्रापूर-चाकण येथे गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे. सुमारे एक फूट व्यासाची गॅस पाइपलाइन टाकण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा हद्दीतील दुष्मी, ठाकूरपाडा आणि खारपाडा गावातील लोकवस्तीमधून गॅस पाइपलाइन जात असल्याने नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. लोकवस्तीवगळून ही पाइपलाइन कोणत्या भागातून टाकावी यासाठी १९९९ साली सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र कंपनीने अचानकपणे आता गावातील लोकवस्तीमधूनच गॅस पाइपलाइन टाकण्यास सुरुवात केली आहे. एलपीजी गॅस हा ज्वलनशील असल्याने लिकेज झाल्यास पेट धरुन तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
या गॅस पाइपलाइनबाबत एचपीसीएल कंपनी, सरकारी कार्यालयाने नागरिकांना, बाधित शेतकºयांना विश्वासात न
घेता कोणतीच माहिती दिलेली
नाही. गॅस पाइपलाइनला आमचा विरोध नाही, परंतु ती लोकवस्तीतून न टाकता पाताळगंगा नदी किनाºयावरुन म्हणजेच बाहेरुन टाकावी,
अशी कृती समितीची प्रमुख मागणी आहे.
याबाबत कंपनीसह ठेकेदार बाजीराव कालुंत्रे यांना वेळोवेळी सूचित केले असतानाही ठेकेदार कालुंत्रे हे मनमानी पध्दतीने आणि पोलीस बळाचा वापर करुन पाइपलाइन टाकण्याचे काम करीत आहेत. विरोध करणाºयांना त्यांच्याकडून धमकावण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ४ जानेवारी २०१८ रोजी प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. सदरच्या बैठकीला आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील, प्रतिमा पुदलवाड, पेण तहसीलदार अजय पाटणे, एचपीसीएल कंपनीचे वरिष्ठ अभियंता सोेमेश्वर धकाते, आकाश गोखले, मनीष कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.आर. चव्हाण, ठेकेदार बाजीराव कालुंत्रे, दुष्मी-खारपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता वाघे, सदस्य आणि ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीचे निवेदन
कंपनीचा अन्याय कदापि सहन करणार नाही आणि लोकवस्तीतून पाइपलाइन टाकू दिली जाणार नाही, असा इशारा कृती समितीने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीसाठी १४ मार्चपासून पेण प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे कृती समितीने निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी कृती समितीचे निमंत्रक संतोष ठाकूर, सरपंच सविता वाघे, प्रशांत घरत, हिरामण घरत, गंगाधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकवस्तीतून गॅस पाइपलाइनचे काम सुरू
१आमदार पाटील यांनी बैठकीमध्ये ही पाइपलाइन पाताळगंगा नदी किनाºयावरुन नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रांताधिकारी पुदलवाड यांनी कंपनीला काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही काळ काम थांबवण्यात आले होते, मात्र आता पुन्हा लोकवस्तीमधूनच गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरु केल्याने नागरिकांमध्ये असंतोष उफाळून आला.
२प्रशासनालाही जुमानत नसणाºया कंपनी आणि संबंधित ठेकेदाराविरोधात जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कृती समितीने जिल्हाधिकारी यांना २० फेब्रुवारी २०१८ रोजी केली होती, परंतु जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी कोणताही अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने मोर्चा काढावा लागल्याचे निवेदनात म्हटले आहे.