नवी मुंबई : कामगारांची थकीत रक्कम गणेशोत्सवापूर्वी देण्यात यावी, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचे विभाग कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. मंगळवारी घणसोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून, तत्काळ सर्व रक्कम न दिल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
समाज समता संघटनेच्या वतीने प्रत्येक विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड आणि नवी मुंबई अध्यक्ष गजानन भोईर यांनी घणसोली विभागाच्या प्रभारी सहायक आयुक्त संध्या अंबादे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध आस्थापनांवर शेकडो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारची सहकार्याची भावना पालिका प्रशासनाने घेतलेली नाही. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांत बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे आणि बुधवारी दुपारी घणसोली येथील विभाग कार्यालयांवर मोर्चे नेण्यात येऊन पाठपुरावा करण्यात येत आहे. गुरु वारी ऐरोली आणि शुक्रवारी दिघा विभाग कार्यालयावर मोर्चे नेण्यात येतील, अशी माहिती या संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिली. कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनातील थकबाकी व सुधारित विशेष राहणीमान भत्ता लागू करण्याबाबतची कार्यवाही महापालिका मुख्यालय स्तरावर पूर्ण केली असली, तरी प्रत्यक्षात विभाग कार्यालयीन स्तरावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यादरमहा ७ तारखेच्या आत पगार मिळावा, कामगारांना ई.एस.आय.सी.च्या सुविधा मिळवून देण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे, कामगारांना यू.एन.ए. क्रमांक कार्यान्वित करून कामगारांनी दरमहा भरलेल्या भविष्य निर्वाहाची माहिती त्यांच्या मोबाइलवर मेसेज द्वारे मिळावी.गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या विविध आस्थापनांत काम करणाºया कंत्राटी कामगारांना त्यांची देणी, थकबाकीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न केल्यास, सर्व कामगार काम बंद आंदोलन करतील.- गजानन भोईर, अध्यक्ष,समाज समता कामगार संघ (नवी मुंबई)