अंगणवाडी सेविकांचा कोकण भवनवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:06 AM2019-02-01T01:06:58+5:302019-02-01T01:07:10+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी धडक; शासनाच्या वेळकाढूपणामुळे नाराजी
पनवेल : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आहेत. याबाबत शासनाकडून वेळकाढूपणा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांनी कोकण भवनमधील एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने धडक दिली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.
२० सप्टेंबर २०१८ रोजी केंद्रीय महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीबाबत अधिसूचना काढण्यात आलेली होती. त्यामध्ये अनुक्र मे १५००, ७५० रु पये अशी वाढ करण्यात आली होती. प्रोत्साहन भत्त्याचा देखील त्यामध्ये समावेश होता; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचबरोबर सेवासमाप्ती लाभामध्ये तिप्पट वाढ करणे, २०१४ नंतर सेवासमाप्ती झालेल्या अंगणवाडी सेविकांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही ती रक्कम त्वरित अदा करणे, मानधनाच्या अर्धी पेन्शन देणे, आदिवासी व अतिदुर्गम प्रकल्पात काम कारणाऱ्या कर्मचाºयांना अतिरिक्त प्रोत्साहनपर मानधन, आजारपणासाठी एक महिना पगारी सुट्टी, अपघात काळात पगारी रजा यांसारख्या अनेक मागण्या या संघटनेच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. ८ जानेवारी रोजी मंत्रालयावरही अशाप्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळी महिला बाल विकास सचिवांनी निवेदन स्वीकारले होते. या वेळी १९ जानेवारी रोजी सविस्तर चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, पुन्हा याबाबत कोणतीच चर्चा न करण्यात आल्याने अंगणवाडी सेविकांनी ३१ जानेवारी रोजीच्या मोर्चाचा निर्धार केला. संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील, ब्रिजपाल सिंग, सूर्यमानी गायकवाड उपस्थित होते.