नाईकांना घेरण्याचे आघाडीचे डावपेच; मेळाव्यातून केली वातावरणनिर्मिती; कार्यकर्त्यांत उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:16 AM2020-02-06T00:16:57+5:302020-02-06T00:17:30+5:30

नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम

Front-line tactics for hiring heroes; Atmosphere created by the fair; Enthusiasm among activists | नाईकांना घेरण्याचे आघाडीचे डावपेच; मेळाव्यातून केली वातावरणनिर्मिती; कार्यकर्त्यांत उत्साह

नाईकांना घेरण्याचे आघाडीचे डावपेच; मेळाव्यातून केली वातावरणनिर्मिती; कार्यकर्त्यांत उत्साह

Next

- कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : मागील २५ वर्षे महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला खिंडार पाडण्याचे मनसुबे राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आखले आहेत. एप्रिल महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मंगळवारी वाशीत भव्य मेळावा घेऊन आपला इरादा स्पष्ट केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी पुत्रप्रेमाखातर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील महापालिकेची सत्ताही भाजपकडे गेली. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर राज्यभर हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यवतमाळ विधानपरिषदेच्या निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महाविकास आघाडीने आता आपले लक्ष नवी मुंबईवर केंद्रित केले आहे. त्यानुसार तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याच्या दृष्टीने मंगळवारी वाशी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पाटबंधारेमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम व खासदार राजन विचारे यांनी हजेरी लावली.

तसेच या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे स्थानिक नेते व नगरसेवक उपस्थित होते. नवी मुंबईचा सर्वांगीण विकास, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, तसेच गणेश नाईक यांची २५ वर्षांतील मक्तेदारी संपुष्टात आणणे याच मुद्द्यावर उपस्थित मंत्र्यांनी आपल्या भाषणातून भर दिला. विशेषत: प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, मोडकळीस आलेल्या सिडकोनिर्मित इमारतींची पुनर्बांधणी, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन याच प्रश्नांवर उपस्थितांनी आपल्या भाषणातून ऊहापोह केला. तर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी, शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर, उपनेते विजय नाहटा या स्थानिक नेत्यांनी नाईक यांच्या एकाधिकारशाहीवर टीका करीत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला.

अजित पवार यांचे सूचक विधान

महाविकास आघाडीच्या तिकीटवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग असलेली एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालाच्या अधारे इलेक्टिव्ह मेरीटप्रमाणे तिकीटवाटप केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. इतकेच नव्हे, तर प्रसंगी बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीनेही आपली मानसिकता बनवावी, असे सूचक विधान करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजपात मोठी फूट पडण्याचे संकेत या वेळी दिले.

महाविकास आघाडीचा पहिला मेळावा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. १२०० प्रेक्षक क्षमतेचे भावे नाट्यगृह खचाखच भरल्याने नाट्यगृहाच्या बाहेरील मोकळ्या जागेर स्क्रीन लावून कार्यकर्त्यांची सोय केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे.
विभिन्न विचारधारेच्या तीन पक्षांचे राज्यस्तरावर मनोमिलन झाले आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली. मात्र, स्थानिक स्तरावर हा मिलाप घडवून आणताना नेत्यांची दमछाक होणार, हे निश्चित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Web Title: Front-line tactics for hiring heroes; Atmosphere created by the fair; Enthusiasm among activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.