पनवेल : बीड, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक रायगडात मराठा क्र ांती मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवणे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे, मराठा आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी २१ सप्टेंबर रोजी कोकण भवन कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असून त्याच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तयारीला लागले आहेत. कोपर्डी घटनेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषत: मराठा समाजात या घटनेनंतर उद्रेकाची भावना आहे. त्यातूनच हा समाज पेटून उठला आहे. राज्यात बीड, औरंगाबादसह ठिकठिकाणी मोर्चे निघाले. त्याच धर्तीवर रायगडमध्येही ऐतिहासिक मराठा क्र ांती मोर्चाचे नियोजन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली आहे. मोर्चात सर्वपक्षीय मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. २१ सप्टेंबरला खारघर येथून महामार्गाने कोकण भवन येथे आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. मोर्चात रायगड व नवी मुंबईतील लाखो मराठा समाजाचे नागरिक, महिला तसेच विद्यार्थी सहभागी होतील, असा अंदाज आहे.
मराठा क्रांतीचा २१ सप्टेंबरला मोर्चा
By admin | Published: September 13, 2016 2:58 AM