पाम टॉवरमध्ये एफएसआय घोटाळा? सिडकोचे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 06:50 AM2018-03-11T06:50:24+5:302018-03-11T06:50:24+5:30
नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे चेअरमन (ट्रस्टी) अतुल अग्रवाल यांनी केली आहे.
नवी मुंबई - नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे चेअरमन (ट्रस्टी) अतुल अग्रवाल यांनी केली आहे. त्या संबंधीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे व राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहे.
सोसायटी प्लॉट अंतर्गत सिडकोने आयडीबीआय बँकेच्या अधिकारी व कर्मचाºयांसाठी ११ मार्च २००३ रोजी नेरु ळ सेक्टर-४२ ए येथील प्लॉट नं. ११ हा सुमारे १२१०० चौ.मी.चा भूखंड पाम टॉवर को.आॅ.हौ. सोसायटीला
वाटप केला होता. या भूखंडावर
बँकेचे अधिकारी आणि वर्ग-३ व
वर्ग-४ कर्मचाºयांकरिता स्वतंत्र सोसायटी निर्माण करण्यासाठी ६०:४० प्रमाणे भूखंडाचे विभाजन करण्यात आले.
दरम्यानच्या काळात पाम टॉवर सोसायटीने ११ नोव्हेंबर २०१६ रोजी सिडकोकडे ०.५ अतिरिक्त चटईक्षेत्र (एफएसआय) देण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सदर चटईक्षेत्र मंजूर करताना सिडकोने ५९ हजार ८५० रु पये प्रतिचौ. मीटर दराने एकूण ३६३० चौ. मी. क्षेत्रफळाचे २२ कोटी रु पये भरण्यास सांगितले; परंतु सोसायटीने अतिरिक्त चटई क्षेत्राची संपूर्ण रक्कम भरण्याअगोदरच सदर वाढीव चटईक्षेत्र मे. डीबीएस कन्सल्टन्सी प्रा. लि. या त्रयस्त कंपनीला हस्तांतरित करून त्यांच्यासोबत करारनामा केला. यामुळे सिडकोच्या सोसायटी प्लॉट योजनेच्या अटी-शर्तीचा भंग झाला असून, सिडकोकडून राखीव किमतीत ०.५ चटईक्षेत्र घेऊन त्याची त्रयस्त कंपनीला बाजारभावाने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या कागदपत्रांवरून उघडकीस आला आहे.
सिडकोने मंजूर केलेल्या ३६३० चौ.मी. क्षेत्रफळाची बाजार भावानुसार किमान किंमत ७५ कोटींहून अधिक होते; परंतु पाम टॉवर सोसायटीला सुमारे २२ कोटी रु पये सिडकोला भरायचे होते. एकूणच नियमबाह्यरीत्या त्रयस्त कंपनीला चटईक्षेत्र हस्तांतरित करून, सोसायटीने सिडकोचे करोडोंचे नुकसान केल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. या एफएसआय घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली आहे. तसेच या प्रकरणातील संपूर्ण कागदपत्रे शासनाने सिडकोकडून मागविल्याचे पत्र सिडकोच्या वसाहत
विभागास बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले आहे.
तक्रारीबाबत चौकशी सुरू
सोसायटी प्लॉटचे चटईक्षेत्र त्रयस्त कंपनीला हस्तांतर करण्याची कुठलीही तरतूद सिडकोच्या नियमात नाही. सोसायटी प्लॉटला दिलेले अतिरिक्त चटईक्षेत्र हे आयडीबीआय बँकेच्या अधिकारी, कर्मचाºयांसाठीच वापरणे सोसायटीला बंधनकारक असल्याचे सिडकोचे वसाहत व्यवस्थापक (वसाहत-१) फय्याज खान यांनी स्पष्ट केले आहे. अतुल अग्रवाल यांची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमाचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. सोसायटीने नियमानुसार कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यामुळे एफएसआय हस्तांतरित करण्याचा प्रश्न नाही. तक्रारदाराकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार होत आहे. - के. डी. होडावडेकर
माजी अध्यक्ष : पाम टॉवर कॉ.
आॅप. हाउसिंग सोसायटी