नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयाचे रंगकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तीन महिन्यांत रंग निघून गेला असून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.बाजार समितीचा कारभार विविध कारणांनी वादग्रस्त होऊ लागला आहे. अभियांत्रिकी विभागाविषयीही रोष वाढत आहे. पावसाळ्यापूर्वी मुख्यालयाच्या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले होते. इमारतीला पांढरा रंग देण्यात आला. इमारतीचे आयुष्य वाढावे व ती आकर्षित दिसावी यासाठी हे काम करण्यात आले होते. परंतु पावसामध्ये इमारतीच्या मागील बाजूला रंग उडून गेला आहे. भिंतीवर शेवाळ आल्यामुळे पांढरा रंग पोपटी झाला आहे. दोन टप्प्यात जवळपास १० लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. पण रंगकामावर झालेला खर्च फुकट गेला असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.बाजारसमितीच्या मुख्यालयाच्या रंगकामाविषयी माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ठेकेदाराला अद्याप बिल देण्यात आलेले नाही. पावसाळ्यापूर्वी रंगकामाचा एक टप्पा पूर्ण झाला असून नंतर पुन्हा त्यावर एक थर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण मार्केटमधील इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी व एपीएमसीला भेट देणाºया नागरिकांकडून अभियांत्रिकी विभागावर टीका होऊ लागली असून या प्रकरणी निष्काळजीपणा करणाºयांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. मुख्यालय इमारतीमधील इतर दुरुस्तीची कामेही प्रशासनाने सुरू केली आहेत. या कामांचा दर्जा तपासण्याचीही मागणी होऊ लागली आहे. मुख्य प्रशासक व सचिव याविषयी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एपीएमसी मुख्यालयाचे रंगकाम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:22 AM