स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपणारे फाऊंडेशन, पर्यावरण रक्षणाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:14 AM2017-10-05T02:14:20+5:302017-10-05T02:14:44+5:30
कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे.
आविष्कार देसाई
अलिबाग : कच-याचे व्यवस्थापन केले नाही, तर नियतीच ते करायला भाग पाडेल. इच्छाशक्ती असली की, निसर्गसुद्धा मदत करतो. त्यामुळे कच-याचे व्यवस्थापन हे स्वत:पासूनच केल्यास पर्यावरण रक्षणाला मदत मिळणार आहे. देशात धगधगती युवाशक्ती मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यात पर्यावरण रक्षणाची ज्योत पेटवण्याची गरज आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रहित जपण्याचे काम गेली १७ वर्षे महाडमध्ये दिलासा फाउंडेशन ही संस्था करीत आहे.
जिथे अडचण आहे, ज्यांना मदत पाहिजे त्यांच्यासाठी ‘दिलासा’ हे बिरूद लावणा-या दिलासा फाउंडेशनचे किरण क्षीरसागर आणि त्यांच्या टीमचे काम थक्क करणारे असेच आहे. ऐतिहासिक महाड तालुक्यातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रहिताच्या कामाला सुरुवात केली. रसायनशास्त्रातील पदवीधर क्षीरसागर यांनी एमएसडब्ल्यू देखील केले आहे. देशभरात सुरू असलेल्या शौचालय उभारणीच्या मोहिमेत ते रायगड जिल्ह्यात मोलाचे काम करीत आहेत. समुदाय संचालित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यासाठी ते ग्रामपंचायतींना मदत करतात. मुख्य संसाधन संस्था म्हणून सरकारने त्यांची नेमणूक केली आहे.
सरकारने वैयक्तिक शौचालय उभारण्याची योजना आणली; परंतु ती कशी राबवायची. यासाठी दिलासा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आराखडा तयार करून देण्याचे काम करते. शौचालय बांधल्यावर त्याचा वापर करा, तसेच शौचालयासाठी शोषखड्डेच करा, असा आग्रहही त्यांच्याकडून केला जातो.
सांडपाणी, कचरा व्यवस्थापन गरजेचे
सांडपाणी आणि कचरा यांचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीला याची सवय लागण्यासाठी कचºयाचा विषय अर्थकारणाशी जोडला पाहिजे. कचºयापासून पैसा उपलब्ध होऊ शकतो हे एकदा का माणसांच्या मनात बिंबवले की, याबाबतची मोठी चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही.
कचºयावर भविष्यात एखादी मोठी इंडस्ट्री उभी राहू शकते. ‘शून्य कचरा’ याबाबत विविध ठिकाणी जागरूकता केली जात आहे. युवाशक्तीचा यामध्ये अद्यापही उपयोग केला जात नाही, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
धगधगत्या युवाशक्तीला चेतविण्याची गरज आहे. आज प्रत्येकाने स्वच्छतेच्याबाबतीमध्ये जागरूक राहिले पाहिजे, तसे न केल्यास नियतीच आपणाला तसे करण्याला भाग पाडेल, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.