अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत
By admin | Published: April 6, 2016 04:25 AM2016-04-06T04:25:12+5:302016-04-06T04:25:12+5:30
आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील
नवी मुंबई : आग्रोळीतील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गावात स्मशानभूमी नसल्याने शेजारच्या बेलापूर गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी करावे लागत आहे. या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी जीव मुठीत घेवून रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. यात अंत्ययात्रेतील शोकाकुल ग्रामस्थांची परवड तर होतेच, अनेकदा मृतदेहाचीही विटंबना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आग्रोळी गावातील ग्रामस्थांना मागील अनेक वर्षांपासून या समस्येने ग्रासले आहे. गावात एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यविधीसाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. बेलापूर येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. अनेकदा लोकलचा अंदाज येत नसल्याने अंत्ययात्रेची तारांबळ उडते. रेल्वे रुळाच्या खाली उतरताना तर मृतदेहाची अक्षरश: विटंबना होते. आता तर या या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या त्रासात आणखी वाढ झाली आहे. या त्रासातून सुटका करण्यासाठी आग्रोळी गावात स्वतंत्र स्मशानभूमी बांधावी, अशी येथील ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. त्यानुसार २0११ मध्ये महापालिकेने आग्रोळी गावात नवीन स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार केला होता. त्याच्या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मे. अजय कन्स्ट्रक्शन या कंपनीला स्मशानभूमी बांधण्याचे काम देण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. परंतु राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव जैसे थे अवस्थेत पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या बेलापूर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे लाइनच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. अशा स्थितीत गावात कोणाचे मयत झाले तर त्याची अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत कशी न्यायची, असा सवाल ग्रामस्थांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस सुधीर पाटील यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांना एक लेखी निवेदन देवून या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महापौर सुधाकर सोनवणे यांच्याशीही त्यांनी यासंदर्भात चर्चा करून लवकरात लवकर याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)