धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:16 AM2019-07-17T00:16:04+5:302019-07-17T00:16:11+5:30
वाशीमधील अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी शिवाजी चौकात उपोषण केले.
नवी मुंबई : वाशीमधील अतिधोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवाशांनी शिवाजी चौकात उपोषण केले. वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जावू नये अशी मागणी केली. कोणत्याही स्थितीमध्ये घरे खाली करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबईमधील ४४३ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील ५५ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या असून त्या त्वरित रिकाम्या करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. वाशीमधील गुलमोहर व इतर इमारतीमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला होता. महापालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी मंगळवारी वाशीतील शिवाजी चौकात उपोषण केले. अतिधोकादायक घोषित करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. इमारती खाली करून जायचे कुठे असा प्रश्नही रहिवाशांनी उपस्थित केला आहे. महापालिकेकडे संक्रमण शिबिर व इतर काहीही सुविधा उपलब्ध नाही. कोणत्याही स्थितीमध्ये इमारती खाली करणार नाही. प्रशासनाने सक्ती केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. वाशीतील आंदोलनाला नवी मुंबई नागरिक कृती समितीनेही पाठिंबा दिला आहे. कृती समिती या लढ्यात पूर्णपणे सहकार्य केले जाईल. नागरिकांवरील अन्याय कोणत्याही स्थितीमध्ये सहन केला जाणार नाही असा इशारा दिला आहे. यावेळी काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, सूरज देसाई व इतर नागरिक उपस्थित होते.
>महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या घरांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करू नये. कोणत्याही स्थितीमध्ये रहिवाशांवरील अन्याय सहन केला जाणार नसून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- दशरथ भगत, माजी विरोधी पक्षनेते महापालिका
>धोकादायक घोषित केलेल्या इमारतींमधील रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाला इशारा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यानंतरही प्रशासनाने मनमानी सुरू ठेवली किंवा रहिवाशांना बेघर करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल.
- चंद्रकांत हरियान, रहिवासी, गुलमोहर सोसायटी