वाशीतील पोस्टात सामाजिक अंतराचा फज्जा; एकच खिडकी सुरू असल्याने गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:13 AM2020-12-03T02:13:15+5:302020-12-03T02:13:25+5:30
ज्येष्ठांना अधिक त्रास, नागरिकही त्रस्त
नवी मुंबई : वाशी येथील पोस्ट कार्यालयात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुरेसे कामगार असतानाही एकच खिडकी सुरू ठेवली जात असल्याने नागरिकांच्या रांगा लागत आहेत. या दरम्यान, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडत असून, त्यात ज्येष्ठ नागरिकही भरडले जात आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. असाच प्रकार वाशी येथील पोस्ट कार्यालयात घडत असल्याची नाराजी नागरिकांकडून होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कमीत कमी वेळात काम उरकण्याचा नागरिकांचा प्रयत्न असतो. मात्र, पोस्ट कार्यालयात गेल्यावर अनेकदा कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे बुधवारी नागरिकांची गर्दी असतानाही एकच खिडकी सुरू ठेवल्याचा संताप गणेश वाव्हळ यांनी व्यक्त केला. कामकाज निमित्ताने ते त्या ठिकाणी गेले असता, मोठी रांग लागलेली असतानाही एकच खिडकी सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यात ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्य न देता त्याच रांगेत उभे केले होते. यामुळे वाव्हळ यांनी तिथल्या महिला अधिकाऱ्याला ही बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नजरेसमोर असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत कार्यालयाबाहेर पाय टाकला. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. मात्र, यानंतरही त्यांची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे पोस्ट कार्यालयात नागरिकांना मिळत असलेल्या वागणुकीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर कामकाजाच्या वेळेत कर्मचारी कार्यालयाबाहेर जातातच कसे, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.