गावठाणांचा सर्व्हे होणार, सिडकोवर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:55 AM2019-01-24T00:55:53+5:302019-01-24T00:56:04+5:30
गावठाणांचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे.
नवी मुंबई : गावठाणांचा विकास सिडकोमार्फत होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन वर्षांपासून नवी मुंबईकरांमध्ये असलेला संभ्रम दूर केला आहे. गावठाणांच्या विकासावर निर्णय झाल्यानंतरही तो कोणामार्फत होणार याचे चित्र स्पष्ट झालेले नव्हते. अखेर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबाबत घणसोलीत आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यास ते उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करून महामंडळासाठी विविध योजना जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्टÑ राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व प्राण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी आरक्षणाचा निर्णय हीच अण्णासाहेब पाटील यांना खरी श्रद्धांजली अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच हे सरकार माथाडींना उद्ध्वस्त करेल, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, माथाडी चळवळीला सरकार धक्का लागू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर गावठाणांच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेला सर्व्हे सिडकोमार्फत करण्याचाही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात चर्चा झाली असून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना तसे निर्देश देण्यात आल्याचेही ते म्हणाले. नॅशनल मार्केटच्या निर्णयात माथाडींना समाविष्ट केले नसल्याचे निदर्शनास येताच, सरकारने झालेला निर्णय पत्राद्वारे वरच्या सभागृहातून परत घेतल्याचा ऐतिहासिक निर्णय ठरल्याचेही ते म्हणाले. घणसोली परिसरात माथाडी कामगारांची सिम्पलेक्स वसाहत उभारली आहे. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या १५ वर्षांत त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे या वसाहतींचा क्लष्टर डेव्हलपमेंट अंतर्गत विकास व्हावा, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे. यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महामंडळाला योग्य अध्यक्ष मिळाल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनाही भाजपात प्रवेशाचे निमंत्रण देत साताऱ्यात एकही आमदार शिल्लक सोडणार नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, मंदा म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, बाळासाहेब पाटील, विजय चौगुले आदी उपस्थित होते.
>ऐरोली मतदार संघासाठी चाचपणी
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून ऐरोली मतदार संघातून विधानसभा लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच उद्देशाने चाचपणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम माथाडी वसाहत असलेल्या घणसोलीत घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत, याकरिता शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची मदत मिळणार असल्याच्याही चर्चा आहेत. नरेंद्र पाटील यांच्या पाठोपाठ चौगुलेही भाजपाच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता आहे. गतमहिन्यातच वडार समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून नवी मुंबईत सत्ताधारी नाईक कुटुंबाला चितपट करण्याच्या खेळी भाजपाकडून खेळल्या जात असल्याचे दिसून येत आहे.