करंजा बंदरातून मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावणार - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:44 AM2019-01-25T03:44:57+5:302019-01-25T03:45:10+5:30
दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे.
उरण : दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे. मासळी निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, येत्या काळात मच्छीमारांची आर्थिक प्रगती डॉलरमध्ये होईल. शिवाय या बंदरामुळे भविष्यात रोजगारनिर्मिती आणि पर्यटनातही वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उरणमध्ये व्यक्त केला.
करंजा येथील मच्छीमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गुरु वार, २४ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सेझ प्रकल्पामुळे सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. जेएनपीटी सेझमध्ये निर्माण होणाºया रोजगारामध्ये ८० टक्के रोजगार कोकणातील भूमिपुत्रांना दिला जाईल, असा दावाही गडकरी यांनी केला.
देशाच्या विकासाचा मार्ग सागरी मार्गावरूनच जातो, असेच देश जगावर राज्य करतात. त्यासाठी मच्छीमार समाजाचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे आहे. दरवर्षी सहा हजार कोटींचे मासळीचे उत्पन्न १० हजार कोटींंपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रायगड, कोकणातील अनेक बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मुंबई, रायगड, कोकणात विविध ठिकाणी रो-रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मच्छीमारांसाठी इंटरग्रीटेड फिशिंग हबची सुरु वात करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मासळी निर्यातीसाठी सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे भविष्यात मच्छीमारांना मासळी व्यवसायात अधिक संधी निर्माण होऊ शकतील, असेही फडणवीस म्हणाले. करंजा मच्छीमार संंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले.