हॉटेलमधील बंद खोलींआड चालतोय जुगार; हॉटेलवर ठोस कारवाईची मागणी
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 1, 2022 06:42 PM2022-09-01T18:42:44+5:302022-09-01T18:43:11+5:30
शहरातील हॉटेल मध्ये देखील जुगार चालत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.
नवी मुंबई : शहरातील हॉटेल मध्ये देखील जुगार चालत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशा जुगार अड्ड्यांवर सीबीडी पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली असून, मंगळवारी रात्री देखील एका ठिकाणी छापा टाकला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वजण मुंबईचे राहणारे आहेत. केवळ जुगार खेळण्यासाठी ते सीबीडी येथील हॉटेलमध्ये एकत्र जमले होते.
शहरातील अनेक हॉटेल मध्ये बंद खोलींच्या आड नेकम चालतय काय याबाबत प्रश्नचिन्ह उदभवू लागला आहे. काही हॉटेल मधील खोल्या जुगार अड्ड्यांसाठी वापरल्या जात असून, असे काही प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका जुगार अड्ड्यावर सीबीडी पोलिसांनी मंगळवारी रात्री कारवाई केली आहे. सीबीडी सेक्टर १५ येथील एका हॉटेल मध्ये जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी पथक तयार केले होते. या पथकाने मंगळवारी रात्री परिसरातल्या काही हॉटेलची झडती घेतली. त्यामध्ये कॉर्पोरेट हॉटेल मधील एका खोलीत चालणारा जुगार उघड झाला.
एका खोलीत ७ व्यक्ती एकत्र जमून जुगार खेळत होत्या. हा जुगार ठाणेतील सिद्धार्थ नगर मध्ये राहणाऱ्या बाबू नाडर मार्फत चालवला जात होता. तर कारवाईवेळी तो देखील त्याठिकाणी आढळून आला आहे. तर मुंबई परिसरात राहणारे वकील खान, विकास ठाकूर, गुलशेर खान, महेश सिंग, विजय सिंग, गोपाळ खान, पप्पू यादव हे त्याठिकाणी जुगार खेळण्यासाठी जमले होते. त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या सर्वांवर बुधवारी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील सीबीडी पोलिसांनी त्याठिकाणी व इतर हॉटेल मध्ये बंद खोलीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर कारवाई केलेली आहे. त्यावरून शहरातील इतरही हॉटेल मध्ये अशा प्रकारे जुगार अड्डे चालवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा धाक नसल्याने त्यांच्याकडून गैर कृत्यांना थारा मिळत आहे. त्यामुळे जुगार खेळणाऱ्यांसाठी हॉटेल मधील खोली दिल्याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकांवर देखील कारवाईची मागणी होत आहे. मागील काही वर्षांपासून शहरात रस्त्यांवर जागोजागी काला पिला जुगार पहायला मिळत आहे. त्यातच हॉटेल मध्ये चालणाऱ्या जुगारांची देखील भर पडली आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे.