नवी मुंबई : शहरात जुगाराचे अड्डे वाढू लागले असून, चित्रपटगृहाबाहेर तसेच रेल्वेस्थानकांच्या आवारात डाव मांडले जात आहेत. त्या ठिकाणी जुगाऱ्यांची गर्दी वाढत असून, दररोज लाखोंचे डाव लागत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.मागील दोन वर्षांपासून शहरात अवैध धंद्यांना अप्रत्यक्षरीत्या मोकळीक मिळत असल्याचे दिसून येत आहे. कारवायांच्या माध्यमातून गुन्हेगारांचे कंबरडे मोडून काढण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे गांजाविक्री, जुगाराचे अड्डे अशा अवैध धंद्यांनी शहरातल्या संस्कृतीला गालबोट लागत चालले आहे. अशा प्रकारांमुळे तरुण गैरमार्गाकडे वळत असून, जुगाराच्या नादात अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मागील काही दिवसांमध्ये शहरात जुगारांच्या अड्ड्यांमध्येही वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यात काळा-पिवळा जुगार सर्वाधिक प्रमाणात उघडपणे खेळला जाऊ लागला आहे. चित्रपटगृहांबाहेर तसेच रेल्वेस्थानकांच्या आवारात हे अड्डे तयार झाले आहेत. या सर्व अड्ड्यांमागे एकच व्यक्ती असून, त्याचे संपर्क थेट काही पोलीस अधिकाºयांसोबत असल्याचीही चर्चा आहे. यामुळेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागील काही दिवसांपासून घणसोली व कोपरखैरणे स्थानकाच्या आवारात तसेच बालाजी चित्रपटगृहाबाहेर हा जुगार लावला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, उघडपणे चालणाºया या अवैध धंद्याची पोलिसांना खबर लागत नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्षभरापूर्वीही घणसोली स्थानकामध्ये काळा-पिवळा जुगार चालायचा. यासंदर्भात अनेकांनी रेल्वे पोलिसांसह ठिकठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर बंद झालेला जुगार पुन्हा एकदा खेळला जाऊ लागला आहे. या जुगारातून संबंधिताकडे लाखो रुपये जमा होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
रेल्वेस्थानकांचा परिसर बनला जुगाराचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:03 AM