नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:54 PM2020-09-05T23:54:45+5:302020-09-05T23:55:00+5:30
कारवाईस मनपाची दिरंगाई
- नामदेव मोरे
नवी मुंबई : २१६ हॉस्पिटल, ८१ नर्सिंग होम व तब्बल १,४६१ क्लिनिक असलेल्या नवी मुंबईमध्ये समन्वयाअभावी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजार झाल्यास कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. सुरू असलेल्या रुग्णालयांची व तेथील उपलब्ध बेडची माहितीच उपलब्ध नाही. यामुळे रुग्णांना शहरभर फिरावे लागत असून, वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईमधील रुग्णालयांकडून सुरू असलेल्या लुबाडणुकीविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आरोग्य यंत्रणेमधील सावळागोंधळ समोर येऊ लागला आहे. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी रुग्णालयांची व बेडची संख्या वाढविली, परंतु कोरोनाव्यतिरिक्त आजारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
नवी मुुंबई सुनियोजित शहर असल्यामुळे सिडकोने प्रत्यक नोडमध्ये रुग्णालयांसाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. शहरात दौन वैद्यकीय महाविद्यालये, दंतवैद्यकीय महाविद्यालय व इतर अनेक मोठी रुग्णालये आहेत. १० बेडपासून १,१०० बेडची क्षमता असलेली रुग्णालये आहेत. महानगरपालिकेकडील आकडेवारीप्रमाणे तब्बल २१६ हॉस्पिटलची नोंदणी करण्यात आली आहे. ४०५ आयुर्वेदिक, २७२ होमिओपॅथी व तब्बल १,४६१ क्लिनिक शहरात आहेत. तब्बल ८१ नर्सिंग होमची नोंदणी झालेली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बेडची सर्वाधिक उपलब्धता नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा यापूर्वी महानगरपालिकेने पर्यावरणविषयक अहवालामध्ये केला होता.
नवी मुंबईमध्ये रुग्णालयांची संख्या पुरेशी आहे, परंतु कोणत्या रुग्णालयात किती बेडची क्षमता आहे, कोणत्या आजारांवर कोणत्या रुग्णालयात विशेष उपचार केले जातात, आयसीयू, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर्सची संख्या कुठे उपलब्ध आहे, याविषयी कोणतीही माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. मनपाने कोविड रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध करून दिली आहे, परंतु कोरोनाव्यतिरिक्त आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील बेडची माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही दोन वर्षांपासून माहितीमध्ये बदल केलेला नाही. संकटकाळात रुग्णालय बंद ठेवणाऱ्यांवर कारवाईची गरज असून, मनपाने अद्याप एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही.
रुग्णांची फरफट सुरूच
सानपाडामधील ज्येष्ठ नागरिकांची प्रकृती शुक्रवारी बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. काही सामाजिक व राजकीय पदाधिकाºयांनी सानपाडा, नेरुळ व इतर ठिकाणच्या रुग्णालयांत संपर्क साधला, परंतु रात्री उशिरापर्यंत बेड उपलब्ध झाला नाही. अखेर सकाळी बेलापूरमधील एक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.