सहा लाख लोकांच्या आरोग्याशी खेळ
By admin | Published: April 19, 2017 12:59 AM2017-04-19T00:59:40+5:302017-04-19T00:59:40+5:30
सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सिडको वसाहतीतील रस्त्यांची अवस्था उकिरड्यासारखी झाली होती
वैभव गायकर, पनवेल
सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे सिडको वसाहतीतील रस्त्यांची अवस्था उकिरड्यासारखी झाली होती.
सफाई कामगारांची ठाम भूमिका आणि सिडकोच्या आडमुठ्या धोरणांमुळे गेल्या सहा दिवसांपासून सामान्य नागरिक कचऱ्यामुळे चांगलाच भरडला गेला. अखेर सातव्या दिवशी कोकण श्रमिक संघटनेबरोबर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी बैठक घेतली आणि मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यावर कामगार नेत्यांनी आंदोलनास स्थगिती दिली. मात्र या आंदोलनाने सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असून सिडको - कामगारांच्या लढाईत सर्वसामान्यांचा बळी का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी सिडकोने आपली जबाबदारी म्हणून सफाई कामगारांना विश्वासात घेतले असते तर गेल्या सहा दिवसांपासून सिडकोच्या विविध नोडमध्ये कचऱ्यामुळे जो गोंधळ उडाला आहे, रोगराई, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तो झाला नसता. मंगळवारी संप मिटल्यावर दुपारनंतर कचरा उचलण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्येक नोड, सोसायटी, रेल्वे स्थानक आदी सिडको वसाहतीत साचलेला हजारो टन कचरा उचलण्यास सिडकोला दोन-तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.
सिडको नोडमध्ये ३३ सफाई कंत्राटदारांमार्फत शहरात विविध ठिकाणी सफाईची कामे केली जातात. रस्ते, वसाहती, सिडको कार्यालय, स्मशानभूमी, मलेरिया औषध फवारणी, सिडको कँटीन आदी ठिकाणी काम करणारे १३०० कामगार कोकण श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाखाली १२ एप्रिलपासून संपावर गेले होते. ठेकेदारांनी कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका घेत सिडकोने कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. कचरा प्रश्न अधिक चिघळल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला.
तब्बल सहा दिवसांपासून खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत, वडघर, तळोजा आदी ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे मोठे ढीगच्या ढीग पडले होते. दुर्गंधीमुळे त्रस्त झाल्याने काही ठिकाणी अज्ञातांकडून रात्रीच्या वेळी कचऱ्याला आग लावण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेल्या धुराचाही नागरिकांना त्रास झाला.
सिडको स्थापनेपासून आजवरचे हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे बोलले जात आहे. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, कामगारांच्या बदलीचे देखील अधिकार आम्हाला नाहीत, त्यामुळे त्यांना काढण्याचा प्रश्नच येत नाही. जोपर्यंत कामगार कामावर येत नाहीत तोपर्यंत काहीच करू शकत नाही. नाका कामगारांमार्फत कचरा उचलायला सुरु वात केली तर त्यांना संरक्षण कोण देणार? सिडकोकडून कामगारधार्जिणे धोरण राबवण्यात येत असल्याची प्रतिक्रि या सफाई कंत्राटदार संदीप पाटील यांनी दिली.
शहरात साचलेल्या कचऱ्यामुळे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवली होती. नवीन पनवेल माथेरान रोड, तसेच आदई सर्कलवरून, खांदा वसाहतीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर इतका कचरा साचला होता की एक लेन बंदच करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी सिडकोकडून मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्यानंतर सफाई कामगारांनी आंदोलन स्थगित केले. मात्र तोपर्यंत शहरात तब्बल अडीच हजार टनाच्या आसपास कचरा सिडकोच्या विविध नोडमध्ये साचला होता.सफाई कामगारांच्या आंदोलनाने पनवेल महापालिका क्षेत्रातही समस्या उद्भवली. यासंदर्भात पालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना विचारणा केली असता, या सर्व गोष्टी सिडकोच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे पालिका काहीही करू शकत नाही. सफाई कामगारांच्या संदर्भात सिडकोने कंत्राटदारांशी करार केला असल्याने त्यांनीच योग्य मार्ग काढावा, असे सुचवले.सहा दिवसांपासून उद्भवलेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले होते. लाखो नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्न असताना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री याठिकाणी फिरकलेच नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त आहे.