नवी मुंबईमध्ये ३० हजार घरांमध्ये होणार गणरायाचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:50 PM2020-08-21T23:50:52+5:302020-08-21T23:51:07+5:30
गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे.
नवी मुंबई : गणरायाच्या स्वागतासाठी शहरात ३० हजार घरांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ३३० ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवादरम्यान शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महानगरपालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अनेक मंडळांनी सार्वजनिक उत्सव रद्द केला आहे. बहुतांश मंडळांनी दीड दिवसाच्या उत्सवाचे आयोजन केले आहे. आगमनासाठी व विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी पोलिसांकडून ५५० सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली होती. या वर्षी ३३० मंडळांनीच परवानगी घेतली आहे. यामध्येही गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे.
उत्सव शांततेत व आनंदामध्ये पार पाडण्यासाठी ृबंदोबस्तासाठी ५५० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यामध्ये २१ पोलीस निरीक्षक व ६२ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. सर्व सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान कोठेही गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी कृती होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
>विसर्जनासाठी १३५ कृत्रिम तलाव
मनपा क्षेत्रात प्रत्येक वर्षी २३ तलावांमध्ये विसर्जन केले जाते. या वर्षी पहिल्यांदा १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून त्यामध्ये बेलापूर विभागात १५, नेरूळ विभागात २७, वाशी विभागात १६, तुर्भे विभागात १७, कोपरखैरणे विभागात १४, घणसोली विभागात १७, ऐरोली विभागात २२ व दिघा विभागात ७ तलावांचा समावेश आहे. विभागनिहाय कृत्रिम विसर्जन तलावांच्या स्थळांबाबतची माहिती त्या त्या विभागांमध्ये होर्डिंगद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून व्हॉट्सअॅप तसेच महानगरपालिकेची वेबसाइट, फेसबुक, टिष्ट्वटर अशा सोशल मीडियावरूनही प्रसिद्धी करण्यात येत आहे.
>कंटेनमेंट झोनमधील विसर्जनासाठी श्रीमूर्ती संकलन व्यवस्था
कंटेनमेंट झोनमध्ये राहणाºया नागरिकांकडील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी या कंटेनमेंट झोनच्या प्रवेशद्वाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने श्रीमूर्ती संकलित केल्या जाणार आहेत. त्या मूर्तींचे सुयोग्य रीतीने विसर्जन केले जाणार आहे.