वैभव गायकर
पनवेल : शहरातील देवाळे तलावाचे बुधवारी रायगड जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. सुमारे १ कोटी ९७ लाख रु पये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच धर्तीवर तलावाशेजारी असलेल्या महात्मा गांधी उद्यानाचे देखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. पनवेलच्या एका टोकाला असलेल्या या उद्यानात नागरिकांना आपला वेळ घालवता यावा याकरिता हे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तलावात असलेले कारंजाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी याठिकाणी अॅम्पी थिएटर देखील उभारले जाणार आहे. याकरिता सुमारे दीड कोटी रु पये खर्च केला जाणार आहे. या सुशोभीकरणात महात्मा गांधी उद्यानाचे रूपडे पूर्णपणे पालटणार आहे. या सुशोभीकरणामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची उंची देखील वाढविणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले. या उद्यानात शोभेची झाडे देखील लावली जाणार आहेत. लवकरच यासंदर्भात आराखडा तयार करून लवकरच तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे. यानंतर रीतसर निविदा काढून हे काम पूर्ण केले जाणार आहे. शहरातील उद्याने आदी ठिकाणी नागरिक दोन क्षणाची उसंत घेण्यासाठी जात असतात. या ठिकाणांचे योग्य सुशोभीकरण केल्यास नागरिकांना देखील प्रसन्न वाटेल. लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे अशी प्रतिक्रिया आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.