अलिबाग : गांधीजी म्हणत होते की, गुन्ह्याचा द्वेष करा, गुन्हेगारांचा नाही. कारण गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन शक्य आहे. याच गांधी विचारांस अनुसरुन, ‘हिंसामुक्त समाजरचने’चे व्रत घेतलेल्या मुंबई सर्वोदय मंडळातर्फे येथील जिल्हा कारागृहातील ३५ बंदिजनांसाठी शुक्रवारी गांधीजींच्या पुस्तकावर आधारित गांधी शांती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या पुस्तकातील ज्ञानाने गुन्हेगारमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार जिल्हा कारागृहातील बंदिजनांनी के ल्याची माहिती कारागृह अधीक्षक सचिन चिकणे यांनी दिली.मुंबई सर्वोदय मंडळ गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये गांधी शांती परीक्षेचे आयोजन करीत आहे. बंदिजनांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून जीवन व्यतित करण्यास सक्षम बनविणे, हा गांधी परीक्षेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.परीक्षेपूर्वी बंदिजनांना गांधीजींच्या मूल्यांची ओळख करून देण्यासाठी सर्वोदय मंडळासोबत काम करणारे लक्ष्मण गोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. प्रथम तीन क्रमांकांच्या बंदिजनांना पारितोषिके देण्यात आली व परीक्षेला बसलेल्या सर्व बंदिजनांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा कारागृहात गांधी शांती परीक्षा
By admin | Published: February 09, 2017 4:47 AM