गणपती बाप्पा पावला! ३५० टन नारळाची आवक; १,८६४ टन फळांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:52 AM2023-01-25T05:52:18+5:302023-01-25T05:53:01+5:30
माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे.
नवी मुंबई :
माघी गणेशोत्सवामुळे फळांसह नारळ, गूळ, साखरेलाही मागणी वाढली आहे. मंगळवारी फळ मार्केटमध्ये तब्बल १ हजार ८६४ टन फळांची विक्री झाली आहे. ३५० टन नारळ, ३७४ टन साखरेसह गुळालाही मागणी वाढली आहे. उत्सवामुळे केळी, संत्री, मोसंबी, सफरचंदला ग्राहकांनी पसंती दिली आहे.
बाजार समितीमधील मसाला मार्केटमध्ये तीन दिवसांमध्ये जवळपास १ हजार टन नारळाची विक्री झाली. मंगळवारी ३५० टन नारळाची आवक झाली आहे. गणेशोत्सवाबरोबर घरगुती वापरासाठीही नारळाला मोठी मागणी असते. दक्षिणेतील राज्यांतून नारळाची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये दिवसभरात ३७४ टन साखर, ३३ टन गूळ, ३ टन तुपाची आवक झाली आहे. सुक्यामेव्यालाही समाधानकारक मागणी होती.
गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी १२०० ते १५०० टन फळांची आवक होत आहे. गणेशोत्सवामुळे १८०० टन फळांची आवक झाली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी यांना गणेशभक्तांकडून मोठी मागणी आहे. उत्सवामुळे केळीचाही खप वाढला आहे. बाजार समितीच्या बाहेरील पूजा साहित्य व इतर वस्तू खरेदीच्या मार्केटमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती.
वस्तू बाजारभाव आवक (टन)
कलिंगड ६ ते १० किलो ४२३
साखर ३३ ते ३६ किलो ३७४
नारळ १२ ते २० नग ३५०
संत्री ६० ते ९० किलो २६४
पपई १० ते २६ किलो २२५
मोसंबी ४० ते ८० किलो १८८
अननस २० ते ४० किलो १२९
सफरचंद ७० ते १०० किलो ११५
डाळींब ८० ते १५० किलो ७५
चिक्कू ३० ते ४० किलो ४३
गूळ ४६ ते ५१ किलो ३३
सण, उत्सव काळात फळांनाही मागणी वाढते. माघी गणेशोत्सवात देवापुढे प्रसाद ठेवण्यासाठी व पूजेसाठी फळांची आवश्यकता असते. सध्या बाजार समितीमध्ये संत्री, मोसंबी, सफरचंद, कलिंगड, अननस व इतर फळांची चांगली आवक होत आहे. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट