डीपीएस तलाव महापालिकेकडे हस्तांतरणास गणेश नाईक यांची सहमती; पर्यावरणप्रेमी आंदोलनास मिळाले बळ
By नारायण जाधव | Published: June 28, 2024 03:43 PM2024-06-28T15:43:12+5:302024-06-28T15:50:09+5:30
नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता.
नवी मुंबई : पाचबीच मार्गावरील ३० एकरातील डीपीएस फ्लेमिंगो तलाव नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांरित करण्यासाठी पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला आमदार गणेश नाईक यांनी पाठिंबा दिला आहे. यासाठी स्वत:सुद्धा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली.
नेरूळ जेट्टीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करताना भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे जलवाहिनी कोरडी पडल्यानंतर फ्लेमिंगोच्या मृत्यूची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या प्रमुख खंडपीठाने स्वत:हून दखल घेतल्याने हा तलाव अलीकडेच चर्चेत आला होता. या तलावात भरतीचे पाणी येण्यासाठी असलेले सिडकोेने बुजविलेले चोक पॉइंट गणेश नाईक यांनी केेलेल्या आंदोलनानंतर नवी मुंबई महापालिकेने तोडून भरतीचे प्रवाह पूर्ववत केले होते. यामुळे सिडकोने यावरून महापालिकेविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.
सिडकोविरोधात तक्रारींचा पाऊस
सिडकोच्या या कृतीविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करून सिडकोवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन गृह सचिव, पर्यावण सचिव, नगरविकास सचिव यांना वेगवेगळ्या प्रकारांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळीवर कब्जा
सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे २५ तलाव हस्तांतरित केले आहेत. परंतु डीपीएस आणि एनआरआय फ्लेमिंगो तलावासह एनआरआय व टीएस पाणथळीवर कब्जा केलेला आहे. यात एनआरआय आणि टीएस चाणक्य यांच्या दुहेरी पाणथळ जमिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, सिडकोने डीपीएस तलावावर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केल्याने हा विषयावर पर्यावरणप्रेमींसह लोकप्रतिनिधींत संताप व्यक्त होत आहे.
सरकारकडे पाठपुरावा करणार
नवी मुंबईतील पर्यावरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर बी. एन. कुमार यांनी गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून डीपीएस तलाव संवर्धन आणि देखभालीसाठी महापालिकेकडे सुपुर्द करणे आवश्यक असल्याची मागणी केल्यावर त्यांनी ती मान्य केली. एवढेच नव्हे तर हा तलाव वाचवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांचे कौतुक करून याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन गणेश नाईक यांनी दिले असल्याचे बी. एन. कुमार यांनी सांगितले.