नवी मुंबई: खैरणे येथील कातकरी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी दिवाळी साजरी केली. कातकरी पाड्यातील बांधवांना साड्या आणि कपडे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर मिठाईचे वाटप करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबईमध्ये दिघ्यापासून बेलापूरपर्यंत विविध ठिकाणी आदिवासी पाडे आहेत. यामधून वारली, कातकरी इत्यादी जमातीचे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष राहत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी आजही आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. आमदार गणेश नाईक यांनी आजतागायत नवी मुंबईमध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना राबवून या समाजाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापालिकेच्या माध्यमातून आदिवासींसाठी मोफत घरकुल योजना राबविण्यात आली. कुडाच्या खोल्यांमधून आदिवासी बांधव पक्या घरांमध्ये राहण्यास गेले. त्यांचे जीवनमान उंचावले. या समाजासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. आदिवासी पाड्यांमध्ये शाळा, समाज मंदिरे, आरोग्य केंद्रे अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
दरम्यान ,आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आदिवासी समाजातील मुले देखील शिक्षण घेऊन नावलौकिक कमावतील, प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठ्या हुद्द्यावर जातील,अशा शुभेच्छा नाईक यांनी यावेळी दिल्या.
आमदार नाईक यांच्या समवेत माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, युवा नेते संकल्प नाईक, स्थानिक माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत डोळे, नगरसेवक चंद्रकांत पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.