झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास शासनानेच करावा, गणेश नाईक यांची मागणी
By कमलाकर कांबळे | Published: July 22, 2024 03:20 PM2024-07-22T15:20:56+5:302024-07-22T15:21:17+5:30
गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला.
नवी मुंबई: झोपडपट्ट्यांमधून राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचे आणि पक्के घर मिळायला हवे. नवी मुंबईतील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या घरांची आणि त्याखालील जमिनीची मालकी द्यावी. तसेच शासनाने म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा विकास करावा, अशी मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक केली आहे.
गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जन सुसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली. यापैकी अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. गाव, गावठाण, शहर, झोपडपट्टी परिसर, औद्योगिक परिसर, एलआयजी, एमआयजी, सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. याप्रसंगी पाणीपुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा निपटारा करण्यात आला. त्यानंतर आ. नाईक यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.
नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी आणि स्थानिकांनी कवडीमोल भावात त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या. नियमानुसार गावठाण विस्तार योजना सिडकोने राबवली नाही. साडेबारा टक्क्यांची योजना पूर्ण केली नाही. काळाच्या ओघात कुटुंबाचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी वाणिज्य बांधकामे केली. आज पर्यंतची अशा प्रकारची सर्व बांधकामे नियमित करावीत. प्रकल्पग्रस्तांना घरांचा आणि त्या खालील जमिनीचा मालकी हक्क द्यावा. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांचा म्हाडाच्या धरतीवर शासनाने विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.