नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक बुधवारी भाजपत जाहीर प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होणार आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिकेवरसुद्धा कमळ फुलणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे ५५ नगरसेवक सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहेत.
प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी शहरात मोठमोठे बॅनर लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या सोबत फलक व बॅनरवर गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांची छायाचित्रे झळकत आहेत. काही फलकांवर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील व जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या स्थानिक नेत्यांनाही स्थान दिले आहे. नवी मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील नाईक समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी भाजपत दाखल होणार आहेत. या प्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून नाईक हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.