नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 02:49 AM2020-02-24T02:49:07+5:302020-02-24T06:56:17+5:30

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

Ganesh Naik shocks in Navi Mumbai; BJP corporators enter the army | नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Next

नवी मुंबई : पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडले आहे. तुर्भे स्टोअर येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चार नगरसेवकांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

सुरेश कुलकर्णी हे आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पालिका निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा रंगली होती. तुर्भे स्टोअर येथे त्यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे आदी शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. यावरून कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले होते.

गेल्या आठवड्यात त्यांच्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या सेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर रविवारी त्यांनी तुर्भे परिसरातील तीन नगरसेवकांसह मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात सुरेश कुलकर्णी यांच्यासह राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले व जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.

पक्षांतराचे नाट्य रंगणार?
पुढील काही दिवसांत भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शहरात पक्षांतराचे नाट्य चांगलेच रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Ganesh Naik shocks in Navi Mumbai; BJP corporators enter the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.