नवी मुंबई : भाजपमध्ये ५५ नगरसेवकांची फौज घेऊन दाखल झालेल्या गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून डावलण्यात आले. या मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आल्याने नाईक नाराज झाले आहेत. त्यातच पंढरवड्यापूर्वी ठाण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपामध्ये डेरेदाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना अपमानाचे घोट पचवावे लागले होते. यामुळे नाईकांनी पुढील रणनीती ठरविण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
भाजपाच्या कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासारखीच अवस्था माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही झाली. व्यासपीठावर जागा न मिळाल्याने ते चक्क पायऱ्यांवर बसून होते. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणाचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी भाजपमध्ये नुकतेच आलेले असा खोचक उल्लेख गणेश नाईक यांचे नाव घेताना केला. त्यावेळी गणेश नाईक कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते. परंतु व्यासपीठावर त्यांच्यासाठी जागाच नसल्याचे त्यांना कार्यकर्त्यांकडून कळले. त्यामुळे त्यांनी तेथून लगेचच काढता पाय घेतला होता.
यानंतर विधानसभा उमेदवारीसाठी बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघावर नाईक कुटुंबाने दावा केला होता. परंतू भाजपाने काल जाहीर केलेल्या 125 जणांच्या पहिल्या यादीत ऐरोली मतदारसंघतून नाईक यांच्या मुलाला संधी देण्यात आली. तर नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून डावलण्यात आले. याजागी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आल्याने सोशल मिडीयामध्ये प्रतिक्रियांचा पूर आला होता. यामुळे गणेश नाईक नाराज झाले असून त्यांनी आज सकाळी महापौर बंगल्यावर नरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे.
गणेश नाईक यांनी ११ सप्टेंबर रोजी पालिकेतील ५२ नगरसेवकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते.
दरम्यान, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांनी नाईक यांच्याबाबत योग्य विचार केला असून योग्य वेळ आल्यावर ते चर्चा करतील असे सांगितले होते.