गणेश नाईक करणार म्हात्रेंचा प्रचार, समर्थकांत प्रचंड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:38 AM2019-10-02T06:38:27+5:302019-10-02T06:38:58+5:30
- कमलाकर कांबळे नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश ...
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारले आहे. या मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे नाईक यांच्या समर्थकांत कमालीची नाराजी पसरली आहे. भाजपने दगा दिल्याचे सूर नाईक समर्थकांतून आळवले जात आहेत.
गणेश नाईक यांनी ११ सप्टेंबर रोजी पालिकेतील ५२ नगरसेवकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे मानले जात होते.
मंगळवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे; परंतु नाईक स्वत: इच्छुक असलेल्या बेलापूरमधून पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता; परंतु नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याने युतीचा धर्म पाळण्याचे आदेश सेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नवी मुंबईतील शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सादर केले आहेत. बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र, बेलापूरमधून नाईक यांनाच डच्चू मिळाल्याने सेनेतील बंड थंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत नाईक काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.
उरणमध्ये युतीबाबत संभ्रम
उरण विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी (अपक्ष), उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा (अपक्ष), संतोष मधुकर पाटील (बसपा) यांचे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरणची जागा शिवसेनेसाठी ठेवली होती. मात्र येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस बालदी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांमध्ये युतीबाबत संभ्रम आहे.
गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली होती.नाईक स्वत: इच्छुक असलेल्या बेलापूरमधून मात्र पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले.
विजय नाहटांची भूमिका अस्पष्ट
बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार अद्यापि निश्चित झालेला नाही. बेलापूरची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने मागील चार वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणारे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा काय भूमिका घेतात, हे ४ आॅक्टोबरनंतरच स्पष्ट होणार आहे.