महापालिका निवडणुकीत नव्या-जुन्याचा राजकीय वाद गणेश नाईकांना भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:58 PM2020-03-10T22:58:19+5:302020-03-10T22:59:08+5:30
नवी मुंबई महापालिका निवडणूक : भाजपमधील अंतर्गत गटबाजी महाविकास आघाडीच्या पथ्यावर
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजप किंबहुना गणेश नाईक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे नाईक समर्थक काहीसे निश्चिंत आहेत. असे असले तरी भाजपमधील जुना आणि नवीन वाद उफाळून येत असून, ही बाब नाईक यांना चांगलीच भोवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेवर कोणतेही प्रयास न करता भाजपची सत्ता अस्तित्वात आली. आता ही सत्ता अबाधित राखण्याची जोखीम गणेश नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या मंदा म्हात्रे यांना पक्षाने काहीसे लांब ठेवल्याचे बोलले जात आहे.
पहिल्याच प्रयत्नात भाजपला एक आमदार व महापालिकेत सहा नगरसेवक निवडून आणणाºया आमदार मंदा म्हात्रे यांना निर्णयप्रक्रियेपासून अशा प्रकारे दूर ठेवले गेल्याने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांत खदखद आहे. हीच खदखद ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील गटबाजीला कारण ठरणारी असल्याची चर्चा आहे.
नवी मुंबई महापालिकेवर मागील पंचवीस वर्षांपासून गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि गणेश नाईक हे समीकरणच तयार झाले आहे. पण या समीकरणाला छेद देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नाईकांचे जुने दोन पक्ष एकत्र आले आहेत.
महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. परंतु महाविकास आघाडीची ही लढत थेट भाजपसोबत कमी आणि गणेश नाईक यांच्याविरोधात अधिक असल्याचेच चित्र सध्या निर्माण झाले आहे. नवी मुंबईत कोणत्याही निवडणुका असल्या की विरोधकांच्या प्रचाराच्या अग्रभागी नाईक हेच राहिल्याचा नवी मुंबईकरांचा आतापर्यंतचा अनुभव आहे.
चार दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या वातावरणनिर्मितीसाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला सोडून थेट नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावरून नाईक हे राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपलाही सोयीच्या अंतरावर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, नवी मुंबई आपल्याच ताब्यात राहणार, असा दावा गणेश नाईक व त्यांचे समर्थक करीत आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून नाईकांना धक्का देण्याची तयारी चालविली आहे. दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून येत आहे. नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातून आजही समेट घडलेला नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यातून एकत्रित निवडणूक लढवली जात असली तरी अंतर्गत गटबाजी सुरूच आहे. त्यामुळे भाजपमधील नाराज गटही नाईकांच्या विरोधात काम करण्याची शक्यता वर्तविली आहे.