बोर्डाच्या धरतीवर दहावी सराव परीक्षेचा शुभारंभ, "आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा", गणेश नाईक यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
By कमलाकर कांबळे | Published: January 6, 2024 07:01 PM2024-01-06T19:01:02+5:302024-01-06T19:02:01+5:30
Navi Mumbai: दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सराव परीक्षेचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई - दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सराव परीक्षेचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मागील पंचवीस वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेतला आहे. नेरूळ येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये तिचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक तसेच विशेष अतिथी म्हणून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नात जयश्री चौगुले, निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी ८५ शाळांमधील एकूण ९९०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. २६ केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती संजीव नाईक यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली. ज्येष्ठ वैज्ञानिक आनंद चौगुले यांनी जीवनामध्ये उपयोगी पडेल असे ज्ञान मिळवा आणि आपली बुद्धिमत्ता योग्य क्षेत्रामध्ये वापरा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
तज्ज्ञ शिक्षकांमार्फत उत्तरपत्रिकांची तपासणी
बोर्डाच्या धरतीवर आयोजित केलेल्या या सराव परीक्षा २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. तिच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्या त्या विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे तिचा तत्काळ निकाल जाहीर करून अव्वल ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक पारितोषिके दिली जाणार आहेत.