गणेशोत्सव महापालिकेकडून नियमावली जाहीर; उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:20 AM2020-07-24T00:20:39+5:302020-07-24T00:20:43+5:30
आरोग्य विषयक उपक्रमांवर भर देण्याच्या सूचना
नवी मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी; तसेच सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करताना सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम आणि आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गणेशोत्सव २२ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत तसेच नवरात्रौत्सव १७ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित आहे. तसेच सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नियमानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावेत. या वर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.
मूर्ती शाडूची अथवा पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. आगमन आणि विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळावे. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन करावी, आदी सुचना महापालिकेच्या वतीने गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत. रीतसर परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरू करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
विभाग कार्यालयात शनिवारी बैठक : अंमलबजावणी करण्यासाठी व याबाबत सविस्तर माहिती देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये संबंधित विभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, विभाग स्तरावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
सर्व गणेशोत्सव, नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळांतील मुख्य पदाधिकाऱ्यांनी २५ जुलै रोजी आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित विभाग कार्यालयामध्ये कोविडच्या सुरक्षा नियमावलीचे पालन करून, सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत या बैठकीस उपस्थित राहून नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.