नवी मुंबई : विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याच्या केबलची चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल व वाहने असा ८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पनवेल परिसरात ट्रान्सफॉर्मरमधून केबल चोरी प्रकरणावरून या टोळीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.पनवेल परिसरात वितरणच्या ट्रान्सफॉर्मर सातत्याने बंद पडत असल्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होवून स्थानिकांचा वितरण कंपनीविरोधात रोषही वाढत होता. परंतु हा संपूर्ण प्रकार तांब्याची केबल चोरी करणाऱ्या टोळीमुळे घडत होता. ट्रान्सफॉर्मर बंद पाडून त्यामधील तांब्याची केबल चोरणारी टोळी पनवेल परिसरात सक्रिय होती. त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या टोळीचा छडा लावण्याकरिता उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत होते. यादरम्यान पुण्याच्या एका टोळीची माहिती खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक राजन जगताप यांना मिळाली होती. ही टोळी कारने पनवेलला येवून तांब्याच्या वायर चोरी करून नेत होती. त्यानुसार आळंदी परिसरात छापा टाकून चौघांना अटक करण्यात आली आहे. आझम सुलेमानी (२०), सद्दाम सुलेमानी (३०), मशहूरआलम खान (३०) व अब्दुल शेख (३१) अशी त्यांची नावे आहेत. अब्दुल हा भंगार व्यावसायिक असून तो इतर तिघांनी चोरून आणलेल्या तांब्याच्या केबल खरेदी करत असे.आझम, सद्दाम व मशहूरआलम हे तिघे सफारी (एमएच १४ डीए १२१३) कारने पनवेल परिसरात यायचे. रात्रीच्या वेळी विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद पाडून आॅइल थंड झाल्यानंतर त्यामधील तांब्याची केबल चोरून नेत असे. अशाप्रकारे त्यांनी पनवेल, ठाणे ग्रामीण, चाकण, आळंदी परिसरात देखील केबलची चोरी केलेली असल्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी सांगितले. अटक केलेल्या टोळीकडून ८२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल, एक मोटारसायकल व गुन्ह्यासाठी वापरलेली सफारी कार असे ८ लाख ३२ हजार रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
ट्रान्सफॉर्मरमधून तांबे चोरणारी टोळी गजाआड
By admin | Published: August 26, 2015 10:45 PM