- नामदेव मोरेनवी मुंबई - ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुर्भे येथे तीन ठिकाणी गांजाची रोपे नागरिकांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली असून, या प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले.नवी मुंबईमध्ये अमली पदार्थांच्या विक्रीसह गांजाची लागवड करण्याचे प्रकारही निदर्शनास येऊ लागले आहेत. ‘लोकमत’ने एप्रिलमध्ये स्टिंग आॅपरेशन करून इंदिरानगरमधील उद्यान, कोपरी येथील स्मशानभूमीमध्ये गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आणले होते. यानंतर, एमआयडीसीमधील डी ब्लॉकमध्येही गांजाची लागवड केली आहे. येथील बर्माईको व तलरेजा कंपनीच्या बाहेरील रोडनजीक हिरवळ विकसित केली आहे. तेथील एका वृक्षाला लागून गांजाची रोपटी लावली आहेत. जवळपास तीन फूट उंचीची रोपे झाली आहेत. भावना फोर्ड कंपनीच्या भूखंडाच्या बाहेरही गांजाची दोन रोपे आढळली आहेत. गांजा ओढणाऱ्यांनी माळी काम करणाºयांच्या सहकार्याने ही रोपे लावली असल्याचे नागरिकांनी सांगितले. गांजाची लागवड करणाºयांवर काय कारवाई केली जाणार, याविषयी माहिती घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
एमआयडीसीमध्ये गांजाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:29 AM