गांजाविक्रेत्याला अटक
By admin | Published: January 11, 2017 06:33 AM2017-01-11T06:33:31+5:302017-01-11T06:33:31+5:30
नेरूळमधील बालाजी टेकडीजवळ गांजाविक्री करणाऱ्या रामकृष्ण दास या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
नवी मुंबई : नेरूळमधील बालाजी टेकडीजवळ गांजाविक्री करणाऱ्या रामकृष्ण दास या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून ७५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
बालाजी टेकडीजवळ रामकृष्ण दास नावाचा तरुण गांजाविक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक अमित शेलार व त्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सायंकाळी या परिसरात सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक बनवून एक व्यक्तीला पाठविण्यात आले असता, दास गांजाविक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला पकडून झडती घेतल्यानंतर तब्बल ७५० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याच्यावर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने जून २०१६ पासून आतापर्यंत २४ गुन्हे दाखल केले असून ३६ जणांना गजाआड केले आहे. कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह अमित शेलार, कासम पिरजादे, राहुल कर्डीले, मुके, गाढवे व ठाकूर या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
टीमचा धडाका
नवीन वर्षात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांच्या पथकाने तुर्भेनाका परिसरात चरस व गांजाविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली होती. यानंतर नेरूळमधील गांजाविक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती.